किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी केला दावा
अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या दहा वर्षात आजी माजी आमदारांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनतेची त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा परिणाम येत्या २० रोजी मतदानातून दिसून येणार आहे. बळीराजा त्यांना त्यांची योग्य जागा दाखवून देणार असल्याचा विश्वास किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील (जीभाऊ) यांनी केला आहे.
प्रा. सुभाष पाटील यांनी म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात गेल्या दहा वर्षात अस्मानी सुलतानी संकटांनी थैमान घातले. मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे ह्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. माजी आमदार शिरीष चौधरी हे पाच वर्ष बेपत्ता होते, आणि मंत्री महोदय यांनी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांवर ‘आपत्ती’ आलेली असताना त्यांना ‘ मदत न करणाऱ्या आजी माजींचे पुनर्वसन आता शेतकरी राजा करणार असल्याचे प्रा. सुभाष जिभाऊ यांनी सांगत डॉ. अनिल शिंदे भरघोस मतांनी विजयी होणार असल्याचे सांगितले आहे.
तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार
महाविकास आघाडी सत्तेत आल्यास तीन लाखापर्यंत कर्जमाफी करणार असून नियमित शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन सुट देणार आहे. तसेच शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देऊन पीक विम्यातील जाचक अटी काढून सुलभ योजना तयार करणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला शेतकऱ्यांसह जनतेचा मोठा प्रतिसाद राज्यभरातून लाभत आहे.