पोलिसांनी दोघांना पकडून जप्त केला साडेतीन किलो गांजा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या सारबेटे येथील दोघांना पोलिसांनी अटक करून साडेतीन किलो गांजा जप्त केल्याची करवाई हेडावे रस्त्यावर केली. त्यांच्याकडून दुचाकीसह गांजा जप्त करण्यात आला आहे.

 याबाबत अधिक माहिती  अशी की, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथून मोटरसायकलवर (एमएच १९ , डीयु ९५४३) दोन जण अमळनेर शहरात गांजा विकण्यासाठी आणत आहेत. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, हेडकॉन्स्टेबल सुनील महाजन, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, विनोद संदानशीव, संतोष नागरे, सागर साळुंखे यांना घेऊन हेडावे गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास दोन जण मोटरसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्या दोघांच्यामध्ये पांढऱ्या रंगाची प्लास्टिक गोणी आढळून आली. त्यात गांजा सापडला. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता अकील इब्राहिम मेवाती (वय ३७) व मोहसीनखान शरीफखान मेवाती (वय ३२ दोन्ही रा. सारबेटे) असे सांगितले. पोलिसांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष गांजाचे मोजमाप केले असता ६८ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४३२ग्राम गांजा, ६० हजाराची मोटरसायकल व १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी  मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस कायदा कलम ८ ,२० ,२२ व भारतीय न्यायासंहिता २०२३ च्या कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *