अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यानी एकाच रात्री तालुक्यातील दहिवद येथे तीन घरे फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ४ रोजी रात्री ते ५ रोजी सकाळ दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल रमेश महाजन यांनी फिर्याद दिली की ५ रोजी सकाळी ५ वाजता नळाला पाणी आले म्हणून वडील उठले असता त्यांना किचन मधील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तेव्हा अमोलच्या आईने धान्याच्या कोठीत ठेवलेले ९ हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅम सोने व ९८ हजार रुपये रक्कम तपासले असता ते मिळून आले नाही. आजूबाजूच्या लोकांना हे संगीतले असता त्यांनी माहिती दिली की गावातीलच भगवान भिवंसन माळी आणि नीता संजय वाघ हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांचीही घरे फोडण्यात आली. भगवान माळी यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख आणि २४ हजार रुपयांच्या ८ ग्राम सोन्याच्या बाळ्या तर नीता वाघ यांच्या घरातील ५० हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचे १०० ग्राम चांदीचे दागिने, १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्राम मनी मंगळसूत्र, ३ हजार रुपये किमतीची१ ग्राम सोन्याची बाळी, १५ हजार रुपये किमतीच्या ५ ग्राम सोन्याच्या रिंग, १२ हजार रुपये किमतीच्या चार ग्राम सोन्याच्या कड्या, ९ हजार रुपये किमतीचे ३ ग्राम सोन्याचे डोरलं असा एकूण तिन्ही घरातील ३ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले. अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.