जैतपीर येथील रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल नसल्याने वाहनधारकांची मोठी कसरत

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जैतपीरच्या रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल नसल्याने रेल्वेचे फाटक दिवसभरात 25 ते 30 मिनिटे बंद केले जाते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत होते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.

अमळनेर तालुक्यातून जाणारा पाळधी ते दोंडाईचा राज्य महामार्ग क्रमांक सहा हा दोन जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग व जवळच नरडाणा औद्योगिक वसाहत या दोन्ही कारणाने या रस्त्यावर मोठ्या अवजड व लहान वाहनांची नेहमी वर्दळ असते. परंतु या महामार्गावर जैतपीर गावाजवळ असलेल्या रेल्वे गेट क्रमांक 131 जवळ उड्डाणपूल नसल्याकारणाने रेल्वेचे फाटक दिवसभरात 25 ते 30 मिनिटे बंद केले जाते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. अमळनेर येथून दोंडाईचा, नंदुरबार, शिरपूर कडे जाण्यासाठी दर अर्धा तासात बस सेवा उपलब्ध आहे. तसेच शेकडो खाजगी वाहनाने व्यापारी व नोकरदार वर्ग जैतपीर मार्गे जात असतात. भुसावळ सुरत रेल्वे मार्गावर गाड्यांची संख्या वाढलेली असल्याकारणाने दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक दहा ते पंधरा मिनिटे बंद ठेवण्यात येते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वे फाटक बंद झाल्यावर फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा लागतात. त्याच्या सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतो.तसेच नोकरदारांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे रेल्वे विभागाने या ठिकाणी बोगदा न करता उड्डाणपूल करावा. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी आता तालुक्यातून होते आहे.

 

सुरत -भुसावल रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांची संख्या आता वाढलेली असल्याकारणाने दिवसभरात अनेक वेळा रेल्वे फाटक बंद असते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा गावापर्यंत लागतात. त्यामुळे रेल्वे विभागाने या ठिकाणी उड्डाणपूल करणे अत्यंत आवश्यक आहे.

 विलास धनसिंग पाटील, ग्रामस्थ, जैतपीर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *