महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदेंची ग्वाही
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जनतेने संधी दिल्यास मतदार संघातील शेतरस्त्यांचा प्रश्न प्रामुख्याने सोडविणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी दिले आहे.
५ नोव्हेंबर रोजी सती मातेचे दर्शन घेऊन डॉ. शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केली. तालुक्यातील कुऱ्हे बु, कुऱ्हे खु, टाकरखेडा, म्हसले, लोणे, कंडारी, औरंगपुरा, दहिवद, निमझरी, सोनखेडी या गावामध्ये दौरा काढला. या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. मतदारसंघातील सर्व शेतरस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना पायी चिखल तुडवत शेती गाठावी लागते. तालुक्यातील अनेक भागात बैलगाडी शेतापर्यंत जात नसल्याने खांद्यावर खात्याच्या गोण्या घेवून चिखल तुडवावा लागत असल्याचे विदारक चित्र असते. तालुक्यातील जनतेने यंदा सेवेची संधी दिल्यास मतदारसंघातील संपूर्ण शेत रस्ते प्रामुख्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी गावागावात डॉ. अनिल शिंदे यांचे आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात येत असून त्यांच्यासमवेत महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते