अमळनेर (प्रतिनिधी) मागील वर्षी कापसाला सुरुवातीपासून दरवाढ होण्याऐवजी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाकडे पाठ फिरवल्याने यंदा अमळनेर तालुक्यात कापसाचे क्षेत्र घटले. गेल्या वर्षी 51 हजार 978 हेक्टरवर तर यंदा 44 हजार 119 हेक्टरवर लागवड झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील अमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नगाव, टाकरखेडे, हेडावे, अमळगाव, भरवस, वावडे या महसूल मंडळातील 155 गावांमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली आहे. सद्यस्थितीत कापूस वेचणीला सुरुवात झाली असून अनेक व्यापाऱ्यांनी देखील कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. बहुतांश व्यापाऱ्यांनी गणेशोत्सवाचे मुहूर्त साधून खरेदी सुरू करत प्रतिक्विंटल सात हजार रुपये भावाने खरेदी चालू केली आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कपाशीच्या या भावात अजूनही भाव वाढ होईल अशी अपेक्षा आहे. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने कापूस, मका, बाजरी, ज्वारी, मुग यांचे उत्पादन वाढले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचा मका ही काढणीला आला आहे. कापूस व मका शेतकऱ्याच्या हातात आल्याने व कापसाचे दर सुरुवातीलाच गतवर्षेपेक्षा एक हजार रुपयांनी कमी असल्याने एवढ्या भावावर शेतकऱ्यांना कापूस विकणे परवडत नसल्याने कापूस बाजारपेठेत न्यायची हिंमत होत नाही आहे. कारण सध्याचा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव हा खर्चाचा ताळमेळ बसणारा नाही. विकावा तरी संकट अशा कात्रीत शेतकरी सध्या सापडलेला आहे.
यंदा भाव चांगला मिळण्याची अपेक्षा
गेल्या वर्षीचा अनुभव पाहता सात हजार रुपये प्रतिक्विंटल असलेल्या दरात नंतर घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यावर्षी साडे आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर शेतकऱ्यांना आधार मिळेल. नाहीतर उत्पादन खर्च देखील निघणार नाही.
–जिजाबराव पाटील, शेतकरी
कापसाचे भाव वाढण्याची अपेक्षा
कापूस खरेदी चालू झालेली असून कापसाच्या प्रतवारीनुसार भाव ठरवून शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. जागतिक बाजारपेठेतही कापड उद्योगासाठी कापसाची मागणी वाढू लागल्यास कापसाचे भाव अजून वाढण्याची आशा आहे.
– कपिल दलाल, कापूस व्यापारी, अमळनेर