अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य धुळे-चोपडा रस्त्यालगत तीन ते चार मोठ्या शाळा असून, त्या शाळांमध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रोज येतात. मात्र अवजड वाहनांच्या जीवघेणी वर्दळीने विद्यार्थ्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात पालिकांच्या शाळांसह खासगी शैक्षणिक संस्थांच्या मराठी व इंग्रजी तर, इंग्रजी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत. यातील अनेक शाळा मुख्य रस्त्यांच्या बाजूला आहे. काही शाळा तर शहराच्या मध्यवस्तींमध्ये आहेत. ज्याठिकाणी अवजड वाहनांचा राबता असतो. जवळपास सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी बसेस आहेत. तर काही प्रमाणात खासगी व्हॅन आहे. काही प्रमाणात पालकच आपल्या मुलांची ने-आण करीत असतात. या रस्त्यावरील दिवसा लांब व मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ पाहता काही ठिकाणी रबलिंग स्ट्रिप व वेग नियंत्रण सिग्नल, तसेच पांढरे व पिवळे पट्टे, सूचनाफलक यासारख्या विविध उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. सदर राज्य महामार्ग हा शासनाच्या हायब्रीड अँन्यूइटी मॉडेल योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. यासाठी १० वर्षे देखभाल, दुरुस्तीची तरतूद असताना देखील ठेकेदाराकडून देखभाल दुरुस्ती करून घेण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
या ठिकाणी उपाययोजनांची गरज
या ठिकाणी आहेत उपाययोजनांची गरज- साने गुरुजी विद्यालय, (तहसील कार्यालय प्रवेशद्वारासमोर), डी.आर. कन्या हायस्कूल( बसस्थानक प्रवेशद्वारासमोर) व जी. एस. हायस्कूल ( स्वामी समर्थ मंदिराच्या गेट समोर), लोकमान्य विद्यालय (पाच पावली देवी मंदिरा समोर) या ठिकाणी रबलिंग स्ट्रीप व वेग नियंत्रण सिग्नल पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा असे सूचनाफलक या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सूचनाफलक व रबरी गतिरोधक बसवावेत
आमची शाळा धुळेरोड रस्त्यालगत असल्यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी शाळा असल्याचे सूचनाफलक व रबरी गतिरोधक त्वरित बसवावेत.
एस. पी. बाविस्कर पर्यवेक्षिका, डी.आर. कन्या शाळा, अमळनेर
विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार
शहरात धुळेरोड लगत बहुतांश शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. येथून दिवसा अवजड वाहनांची वाहतूक होत असते. ती विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. भविष्यात मोठ्या दुर्घटनेची वेळ येऊ नये. म्हणून मुख्य रस्त्यावर शाळांजवळ उपायोजनांची तातडीने गरज आहे.
प्रवीण मुरलीधर वानखेडे, विद्यार्थिनी पालक,अमळनेर