अमळनेर तालुक्यात मध्य प्रदेशातून १२० किमीवरून शेतमजूर आणून मशागती सुरू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेला महिनाभर सतत पाऊस सुरू असल्यामुळे पिकाची मशागत खोळंबली होती. तरआता सुर्यनारायणाने दर्शन होऊ लागल्याने मशागतीच्या कामांना वेग लागला आहे. त्यामुळे एकाच वेळी मजूर मिळत नसल्याने मध्य प्रदेशातील जामन्या येथून सुमारे १२० किमी वरून मजूर आणून शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत.

   अमळनेर तालुक्यात २१ ऑगस्टपर्यंत ८८.५३ टक्के म्हणजे ५९७.६४ मिमी  पाऊस पडला आहे. गेल्या आठ दिवसांचा खंड सोडला तर तालुक्यात सतत पाऊस पडत होता. शेतजमीन कोरडी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. कोळपणी किंवा निंदणी करता येत नव्हती. जशी पावसाची उघडीप झाली तशी शेतातल्या कामांसाठी घाई लागली. उडीद मूग पिके काढणीला आले आहेत. तर कापूस व मका पिकातील गवत तण वाढले आहे. मात्र एकाचवेळी सर्वांची कामे सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासू लागली. तसेच लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रे जमा करण्यात, त्रुटी पूर्ण करण्यात अनेक गरजू महिला गुंतल्याने मजुरीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. म्हणून शेतकऱ्यांना मध्य प्रदेशातून आदिवासी पावरा समाजाचे मजूर आणावे लागत आहेत. सुमारे १२० किमी अंतरावरून पीक अप व्हॅन किंवा मोठ्या वाहनात मजूर आणले जात आहेत.

 

कमी मजुरीत जादा कामाचा फायदा

 

स्थानिक मजुरांना ३००ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. मुकादमाला मजुरामागे २० रुपये कमिशन द्यावे लागते. स्थानिक मजूर सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत काम करतात. मध्य प्रदेशातील मजुरांना २६० रुपये मजुरी द्यावी लागते. ते सकाळी दहा वाजता कामाला सुरुवात करून दुपारी चार वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे कमी मजुरीत जादा काम होत असल्याने मध्यप्रदेशातील मजूर परवडत असल्याचे वावड्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *