आषाढी एकादशीनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌काढण्यात आली ’मंगल दिंडी‌’

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे  यंदाही देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिर ते संत सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत ‌‘मंगल दिंडी‌’ तसेच विठ्ठल-रखुमाईंची मूर्तीसह पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

मंगलवाद्याचे सूर अन्‌‍‍ टाळ गजराच्या साथीने निघालेल्या दिंडीवेळी पालखी विठ्ठल-रखुमाईची मूर्ती विविध फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. दिंडी मंदिरापासून चोपडा नाका, फरशी पूल, दगडी दरवाजा, सराफ बाजार मार्गाने वाडी संस्थानात पोहोचली. याप्रसंगी दिंडी मार्गावर ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीतील मूर्तींचे औक्षण करून दर्शन घेतले, तर काहींनी पालखी, दिंडीवर पुष्पवृष्टीही केली. याप्रसंगी दिंडीत अनेक भाविकांनी सहभाग नोंदवून फेर धरत नृत्य केले तसेच फुगड्याही खेळल्या. वाडी संस्थानात दिंडी पोहोचल्यावर विठ्ठल मंदिरात पालखीतील मूर्तींच्या भेटीचे अनोखे दर्शन भाविकांना घडविण्यात आले. यावेळी विठ्ठलनामाचा तसेच संत सखाराम महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर मंगल सेवेकरी विशाल शर्मा यांनी दिंडीत सहभागी भाविक व सेवेकऱ्यांचे यथोचित स्वागत करून केळी व फराळाचे वाटप केले. त्यानंतर दिंडी, पालखी मिरवणुकीची सांगता झाली. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या दिंडी, पालखी मिरवणुकीत उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, जी. एस. चौधरी, राहुल बहिरम, पुषंद ढाके, उमाकांत हिरे, मंगल सुरक्षारक्षक यांच्यासह सेवेकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.

 

श्री मंगळग्रह मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलले

 

आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे श्री मंगळग्रह देवतेला विलोभनीय व मनमोहक विठ्ठल रूपात सजविण्यात आले होते. यात देशी-विदेशी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आल्याने संत सखाराम महाराजांचे वाडी संस्थानात दर्शन घेऊन मंदिरात आलेल्या भक्तांना श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतेवेळी विठ्ठल अर्थात पांडुरंगाच्या दर्शनाची अनुभूती मिळाली. भक्तिमय आणि प्रसन्नदायी वातावरणामुळे दिवसभर मंदिर परिसर विठ्ठलभक्तांनी फुलला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *