चौकशी करण्याची श्रीराम आनंदा पाटील यांनी केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघोदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून पूर्ण योजनेचे पैसे लाटण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी, चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीराम आनंदा पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय कार्यालायत निवेदन देण्यात आले आहे.
पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाघोदा येथील पाणीपुरवठा योजनेचे काम दोन वर्षांपासून सुरू असुन ठेकेदार व इंजिनिअर यांनी कामात दुर्लक्ष करून नियमानुसार काम न करता चुकीच्या पद्धतीने काम करून मिलीभगत ने जास्तीत जास्त नफा कमवून ठेकेदार व इंजिनिअर यांनी पैसा आपसात वाटून घेतला आहे. यात मुख्य पाईपलाईनचे खोदकाम नियमानुसार केलेले नसून अर्धवट खोदकाम केलेले आहे. तसेच काळे पाईप जोडणी सुध्दा कच्च्या स्वरूपात अर्धवट जोडणी केलेली आहे. ती पाईपलाईन उठण्याच्या धाकाने लिक होण्याच्या भितीने नविन बांधकाम केलेल्या व पाणी न मारलेल्या उंच टाकीत अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरू केलेला नाही व गावातील जनतेला भर उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित ठेवले. उन्हाळ्यात सदरहु इंजिनिअरला गावातील नागरिकांनी भेटून पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. त्यांनी ठेकेदाराला लगेच सूचना देतो व पाणीपुरवठा सुरू करतो, असे तोंडी सांगितले. परंतु कडक भर उन्हाळा संपून गेला तरी अद्यापपावेतो नागरिकांना पाणी पुरवठा सुरू झाला नाही. नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले. त्यामागील कारण निकृष्ट दर्जाचे काम आहे, म्हणून पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. जास्त दिवस झाल्यावर पाणी पुरवठा सुरू न करता परस्पर काम पूर्ण झाल्याचे दाखवून पूर्ण योजनेचे पैसे लाटण्याचा घाट घातला जात आहे. अशी गावात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.तरी या पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण इस्टीमेट व विभागाकडून कामावर आतापर्यंत पेमेंट दिलेल्या कागदपत्रांची माहिती मिळावी. तसेच वरीष्ठांनी लक्ष घालून व चौकशी करून नागरीकांना न्याय मिळवून द्यावा. पाणीपुरवठा योजना निकामी ठेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आदींनी देण्यात आले आहे.