राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मंजूरी दिल्याची माहिती राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. यामुळे केंद्राचे ग्रामिण रुग्णालयात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दि. ३० जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला असून यात विशेष बाब म्हणून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.सदर मंजुरीमुळे पातोंडा परिसरातील २० ते २५ गावांना याच लाभ होणार असून ग्रामिण रुग्णालय झाल्यानंतर याठिकाणी डॉक्टर व आरोग्य स्टाफसह आरोग्य सुविधा वाढणार असल्याने ग्रामीण जनतेला आपल्या परिसरातच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती यासाठी पातोंडा येथील सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील यांनी विशेष पाठपुरावा केल्याची माहिती मंत्री अनिल पाटील यांनी देत त्यांचे विशेष कौतुक देखील केले.मात्र या मोठ्या मागणीसाठी वरिष्ठ स्तरावरील पाठपुराव्याची गरज असल्याने मंत्री त्यांनी ताकदीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आरोग्य मंत्रालयाने सदर मंजुरी दिली आहे. याकामी पातोंडा सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले.