न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या तक्रारीची दखल घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान
अमळनेर (प्रतिनिधी) पाहिल्याच पावसात शहरातील न्यू प्लॉट भागात भुयारी गटारीमुळे खोदलेले रस्ते खचू लागल्याने चिखल झाला होता. त्यामुळे नागरिकांची अडचण लक्षात घेऊन न्यू प्लॉट परिसर विकास मंचने आवाज उठविताच याची दखल घेऊन खोदकाम व्यवस्थित बुजविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमळनेर शहराती न्यू प्लॉट परिसरात भगिनी मंडळ शाळा ते डी. आर. कन्या शाळा दरम्यान असलेल्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी भुयारी गटारीचे खोदकाम झाल्यानंतर खड्डे जेमतेम बुजविले गेले होते. आता पावसाळा सुरू होताच बुजविलेला तो भाग मोठ्या प्रमाणात खचू लागला होता.एकाची नवी चारचाकी गाडी वाड्याच्या बाहेर रस्त्यालगत पार्क केलेली असताना पहिल्या पावसात रस्ता खचून गाडी एका बाजूने पूर्णपणे खड्ड्यात फसली होती. अखेर क्रेन मागवून ती गाडी बाहेर काढावी लागली होती, विविध शाळांकडे जाणारा हा रस्ता असल्याने येथून नेहमीच लहान बालके जात येत असतात ,महिला व अबाल वृद्ध ही येथून वापरत असतात याशिवाय या परिसरातील जैन मंदिरातील गुरू महाराज देखील येथून नेहमीच अनवाणी जात असल्याने तातडीने हे खोदकाम चांगल्या पद्धतीने बुजवून रस्ता चालण्यायोग्य करावा अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केली होती अखेर जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन भगिनी मंडळ शाळा ते डी आर कन्या शाळेपर्यंत खोदकाम व्यवस्थित बुजविणे सुरू केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.लवकरच या रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी न्यू प्लॉट मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांना दिले आहे. दरम्यान न्यू प्लॉट परिसरात ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटारीचे काम झाले त्या सर्वच रस्त्याचे लवकरच नूतनीकरण करावे अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचने केली आहे.