अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने जागतिक पितृदिनानिमित्त “बाप” या विषयावर खान्देशस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम दहा विजेत्यांना कविसंमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे.
दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार “जागतिक पितृ दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेर शाखेच्या वतीने “बाप” स्व.धनसिंग केशव पाटील स्मृती प्रीत्यर्थ खुली काव्य स्पर्धा खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कवींसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. खान्देशातील कवी – कवयित्री यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष रमेश पवार,प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक,कोषाध्यक्ष संदीप घोरपडे व कार्यकारी मंडळाने केले आहे.
स्पर्धेचे असे आहेत नियम
कविता स्वरचित असावी. कवितेच्या खालील बाजूस आपल्या स्वाक्षरीसह तसे नमुद करणे आवश्यक आहे. प्रथम सहा क्रमांकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम १० कवींना कविसंमेलनात कविता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना कविसंमेलनासाठी प्रवासखर्च स्वतः करावा लागेल. स्पर्धेबाबतचा अंतिम निर्णय परिक्षकांचा व आयोजकांचा राहील.
असे असेल बक्षिस
प्रथम – १५०० रुपये, द्वितीय -११०० रुपये,तृतीय – ७५० रुपये,उत्तेजनार्थ – ५०१ रूपयांची गुणानुक्रमे तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धकांनी येथे पाठवावी कविता
स्पर्धकांनी आपले साहित्य व स्वतंत्र कागदावर आपला परिचय, पूर्ण पत्ता व फोटो असे ई मेल – 1234dvnaik@gmail.com यावर दि.८ जून २०२३ अखेर पर्यंत पाठवायचे आहे,किंवा स्वहस्ते आयोजकांकडे अथवा मुदतीत पोहोचतील या बेताने टपालाने देखील पाठवू शकता. अधिक माहितीसाठी
दिनेश नाईक, प्रमुख कार्यवाह – मोबा. 9226785795,प्रा. डॉ. रमेश माने,स्पर्धा प्रमुख मोबा.9890331237 यावर संपर्क साधावा.