पुरस्कार सोहळ्याने ग्रामीण भागात गावोगावी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण
अमळनेर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतीत २४१ महिलाच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याने ग्रामीण भागात गावोगावी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शासनाने ग्रामीण भागात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला सन्मान करण्याचा शासन निर्णय ९ मे रोजीच जाहीर केला होता. महिला व बालविकास संदर्भात बाल विवाह प्रतिबंध , हुंडा निर्मूलन, महिला सक्षमीकरण , आरोग्य , साक्षरता , महिला स्वयंसहाय्यता बचत गट , मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे प्रस्ताव मागवून समिती तर्फे छाननी करून प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन अशा २४१ महिलांना पुरस्कार वितरित करण्यात आले. गांधली आणि गडखाम्ब गावांना प्रत्येकी तीन पुरस्कार देण्यात आले. प्रत्येक गावात अहिल्यादेवींची जयंती साजरी होऊन त्यांच्या कार्याला देखील उजाळा मिळाला आहे.
कार्यक्रमास जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी परदेशी , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील , सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील कक्ष अधिकारी किशोर पाटील , विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे , एस एस कठळे , ग्रामसेवक भूषण इधे , संरक्षण अधिकारी योगिता चौधरी ,अंगणवाडी पर्यवेक्षिका अलका पाटील उपस्थित होते.
पुरस्कार निवड अशी होती समिती
समितीत गटविकास अधिकारी विशाल शिंदे व महिला बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच , ग्रामसेवक अथवा प्रशासक , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक , पोलीस पाटील , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर यांचा समावेश होता.
असे होते पुरस्काराचे स्वरूप
पुरस्कारात सन्मान चिन्ह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची डिजिटल सही असलेले प्रमाणपत्र ,शाल ,पुष्पगुच्छ आणि रोख ५०० रुपये असे स्वरूप होते.
पुरस्कारामुळे महिला सक्षमिकरणास चालना
राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन घरोघरी अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा दिला आहे. आणि पुरस्कारामुळे महिला सक्षमिकरणास चालना मिळणार आहे.- डी ए धनगर , सामाजिक कार्यकर्ते