अमळनेर (प्रतिनिधी) समाजकंटकांनी सानेगुरुजी स्मारकाच्या जागेवरील कुरणाला आग लावल्याने अनेक झाडे जळून गेल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या दोन बंबानी आग विझवल्यामुळे इतर झाडे वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ८ रोजी सायंकाळी गलवाडे रस्त्याकडील सानेगुरुजी स्मारकाच्या जागेवर असलेल्या गवताला आग लावण्यात आल्याने आग सर्वत्र पसरून तेथे लावलेली अनेक झाडे जळून गेली आहेत. सानेगुरुजी स्मारकावर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. आणि जमिनीची धूप होऊ नये तसेच ओलावा नष्ट होऊ नये म्हणून जमिनीवरील गवत कापले गेले नव्हते. गवतात ससे , घोरपड ,लाहुऱ्या ,कबुतरे,असे पक्षी प्राणी असल्याने काही जण ते पकडण्यासाठी गवताला आग लावून दुसरीकडे सापळे लावतात. मात्र या आगीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. असाच प्रकार अंबर्शी टेकडीवर देखील वारंवार घडले होते. आगीची माहिती पालिकेला कळवताच अग्निशामक दलाचे नितीन खैरनार, जफर खान, आनंदा झिम्बल, भिका संदानशिव, फारुख शेख आदींनी दोन बंब नेऊन आग विझवली त्यामुळे आग रोखण्यात यश आले. यामुळे इतर झाडे वाचवण्यात यश आले आहे.