अॅड. दिनेश पाटील यांच्या सर्तकतेचे होतेय कौतुक
अमळनेर (प्रतिनिधी) न्यायालयाच्या आवारातच ह्रदयविकाराचा झटका आल्याने क्षणाचाही विलंब न करता अॅड. दिनेश पाटील यांनी त्यांन सीपीआर दिला. यामुळे अवघ्या दीड ते दोन मिनिटात त्या व्यक्तीच्या तोंडातून हवा निघाली आणि श्वास सुरू झाल्याने तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आले. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचल्याने अॅड. दिनेश पाटील क्षणाचे डॉक्टर ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात एका बाकावर शरद दामू पवार (वय ५६, रा. रामवाडी) हे बसलेले असताना अचानक खाली पडू लागले. म्हणून उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी त्यांना अलगद बाकावर झोपवले. अटॅक आला म्हणून सारे ओरडू लागले. मात्र नेमके काय करावे म्हणून समजत नसल्याने घाबरलेल्या अवस्थेत सर्व बघत होते. क्षणात तेथे हजर असलेले वकील दिनेश पाटील धावले आणि त्यांनी शरद पवारांच्या छातीवर हाताने सीपीआर देणे सुरू केले. पवार यांचा श्वास बंद पडला होता. त्यामुळे शरीर निपचित पडले. मात्र वकिलाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अवघ्या दीड दोन मिनिटात पवार यांच्या तोंडातून जोरात हवा निघाली आणि त्यांचा श्वास सुरू झाला. यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. वकिलाचे आभार मानून पवार यांना ताबडतोब दवाखाण्यात नेण्यात आले. यामुळे अॅड. दिनेश पाटील यांच्या सर्तकतेचे कौतुक केले जात आहे.