अमळनेर पोलिसांची अवघ्या १० दिवसांत दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांकडून गुन्हेगारीमुक्त अमळनेर शहर करण्यासाठी वॉश आऊट मोहीम राबली जात असून दाऊद म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सराईत गुन्हेगार शिवम देशमुख याच्यावर हद्दपारीची कारवाई करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत दोन गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात दाऊद म्हणून कुप्रसिद्ध असलेला शिवम (शुभम ) मनोज देशमुख (वय २३ रा. पिंपळे रोड) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय शिंदे, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी प्रस्ताव तयार करून पोलीस अधिक्षकांमार्फत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवला होता. जिल्हाधिकारींनी प्रस्ताव मंजूर करताच पोलीस नाईक रवी पाटील व दीपक माळी यांनी शिवम उर्फ दाऊद याला पकडून आणले. त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व धोकादायक व्यक्ती विरुद्ध कायदा अधिनियम १९९६,२००९ ,२०१५ प्रमाणे कारवाई करून पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे , हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील , पोलीस नाईक हितेश चिंचोरे , जितेंद्र निकुंभे यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
शिवम उर्फ दाऊदची गु्न्हेगारी कुंडली
शिवम बाल वयात शालेय शिक्षण घेत असताना चोरी प्रकरणात अडकला होता. २०१३ पासून ते २०२३ पर्यंत त्याच्यावर एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्यात घरफोडी ,मोटरसायकल चोरी , जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न , बेकायदा हत्यार वापरणे , मोटरसायकल चोरी , जबरी दुखापपत करून चोरी , पोलिसांवर हल्ला करणे ,पोलिसांच्या तावडीतून पळून जाणे, दारू पिण्यासाठी हॉटेल वर धुडगूस घालणे, पत्नी सासूला जीवे मारण्याची धमकी, फारकत झालेल्या पत्नीला ऍसिड हल्ला करून जीवन उध्वस्त करण्याची धमकी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो अल्पवयीन असताना शेगाव येथील नगरसेवकाच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. शिवम देशमुख याला दाऊद म्हणून ओळखले जात होते. शहरात त्याची दहशत होती. एक भेळपुरी च्या गाडी मालकांच्या हातावर कोयता मारून फरार असताना त्याने फेसबुकवरून पोलिसांना आव्हान दिले होते.