अल्पवयीन मुलीने मुलाला पळविण्याचा दिला जवाब, तरी कायद्याने तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल

तरुणाला चार दिवसांची पोलीस कोठडी , मुलगी बाल कल्याण समितीकडे रवाना

अमळनेर (प्रतिनिधी ) एक महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसह तरुण धरणगाव पोलिस ठाण्यात हजर झाल्यावर मीच मुलाला पळवून नेले होते, असा अजब जवाब मुलीने दिला. मात्र कायद्याने तरुणावर बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहादरपूर नाका येथील मजुरी करणाऱ्या महिलेची साडे सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी इंदिरा गांधी शाळेत १२ वी ला शिकत होती. १६ रोजी सकाळी मैत्रीणीबरोबर शाळेत गेली व शाळेत गेल्यावर मैत्रिणीला तू वर्गात जा. मला वही घ्यायला जायचे आहे म्हणून तेथून निघून गेली. ती परत आली नाही म्हणून तिच्या आईने शोध घेतला व घरातील वस्तू तपासल्या असता तिने घरातील ९० हजार रुपये आणि सोन्याचांदीचे दागिने सोबत नेल्याचे निदर्शनास आले होते. त्याचवेळी गल्लीतील सुरेश सोमा कोळी हा तरुण देखील बेपत्ता झाल्याचे समजले. त्यामुळे सुरेशनेच तिला फुस लावून पळवून नेल्याचा संशय येऊन अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने सुरेश विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिनाभर राहिले पुण्याला

सुरेश आणि तरुणी महिनाभरपासून पुण्याला राहत होते. ते दोघे स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाले होते. धरणगाव पोलिसांनी त्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे यांच्यासमक्ष अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आला त्यात तिने मीच मुलाला पळवून नेले होते असा जबाब दिला होता. मुलीच्या जबाबवरून ग्रामीण रुग्णालयात तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ती अल्पवयीन असल्याने सुरेश कोळी विरुद्ध अपहरण सह ,बलात्कार ,पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्या. एस. बी. गायधनी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीला महिला बाल कल्याण समिती जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *