अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत गोवर रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती सभा नुकतीच संपन्न झाली.आरोग्य परिचारिका सौ.प्रतिभा पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले तर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रणजित शिंदे हे उपस्थित होते.
भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले असून नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम हाती घेण्याचे ठरविले आहे. हि मोहिम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असून पहिल्या सत्रात सर्व शाळांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शाळेत न जाणारी मुले तसेच ९ महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके यांच्याकरीता ही मोहिम प्रभावीपणे राबविली जाईल या पार्श्वभूमीवर सदर पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
‘गोवर आणि रूबेला हे संक्रामक आजार असून याचा संसर्ग कुणालाच होऊ नये याकरिता खबरदारी घेत भारत सरकारच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारा गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम २०१८ आपण आरोग्य विभाग,शाळा,पालक व बालक या सर्वांच्या सहयोगातून १०० टक्के यशस्वीरित्या राबवू!’ असे आवाहन यावेळी आरोग्य सेविका सौ.प्रतिभा पाटिल यांनी लसीकरण मोहिमेविषयी सविस्तर माहिती देतांना पालकांना केले.
“गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम राबविणेविषयी पालक जागरूक व अभ्यासू होणे गरजेचे आहे आरोग्यविषयक प्रबोधन महत्वाचे आहे!असे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपस्थित महिला पालकांनी विविध शंका व प्रश्न विचारले.तर पालकांनी माहिती जाणून घेतली.आरोग्य सेविका सौ.प्रतिभा पाटील यांनी समाधानकारक माहिती उत्तरस्वरूपात दिली.सभेचे सूत्रसंचालन परशुराम गांगुर्डे यांनी केले.प्रास्ताविक सौ.संगीता पाटील, आभार प्रदर्शन सौ.गीतांजली पाटील यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी आनंदा पाटील, धर्मा धनगर, ऋषिकेश महाळपूरकर, सौ.संध्या ढबु यांनी परिश्रम घेतले.