एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) तुझे लग्न जमू देणार नाही अशी धमकी दिल्याने मामाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे घडली. याप्रकरणी भाच्याने अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रणाईचे येथील प्रकाश भाऊसाहेब पाटील यांनी फिर्याद दिली की २१ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुनंदाबाई धनराज पाटील ही घरासमोरून जात असताना त्यांच्या मावशीत व तिच्यात शाब्दिक वाद झाला. सायंकाळी पाच वाजता धनराज रघुनाथ पाटील घरासमोर येऊन शिवीगाळ करत होते. धनराजने मावशी व आजोबांना मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या मामा विजय साहेबराव पाटील यालाही मारहाण करून तुझे लग्नच जमू देणार नाही आणि लग्न कसे जमते तेच बघतो, अशी धमकी दिली. यापूर्वीही त्याने मामाला तुझे लग्न जमू देणार नाही तू असाच मरून जाशील अशी धमकी दिली होती. याचे वाईट वाटून मामा विजय साहेबराव पाटील याने २३ रोजी सकाळी १२ वाजेपुर्वी सातरणे रस्त्याला शालीक गंगाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर चिंचोलाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून धनराज रघुनाथ पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.