विप्रो कंझुमर केअर आणि आधार बहुद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
अमळनेर (प्रतिनिधी) येथील विप्रो कंझुमर केअर आणि आधार बहुद्देशिय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गांधली-पिळोदे बालाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर झाले.
या शिबिराचे उद्घाटन विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बागजीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विप्रोचे मिलिंद मरकंडे (स्टोअर अँड पर्चेस मॅनेजर), आनंद निकम (अकाउंट मॅनेजर), सुधीर बडगुजर(वेल्फिअर ऑफिसर) आधार संस्थेच्या डॉ.भारती पाटील व श्रीमती रेणू प्रसाद उपस्थित होते. विजय बागजी वाला यांनी उद्घाटन पर मनोगतता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावर्षी अमळनेर येथील विप्रो कंपनी देखील आपला अमृत महोत्सव साजरा करत असून, विप्रोचा अमळनेरातून सुरू झालेल्या प्रवास हा जागतिक स्तरावर पर्यंत असून समाजाचे देणे म्हणून अमळनेर येथे अनेक सामाजिक कार्यक्रम आधार संस्थेसोबत राबवित असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आधारच्या कार्यक्रम समन्वयिका अश्विनी भदाणे, दीप्ती शीरसाठ, यासमिन शेख, निकिता पाटील, मयुर गायकवाड यांनी परिश्रम घेतले. बालाजी विद्यालय गांधी पिळोदा येथील मुख्याध्यापक एस. व्हि. पाटील इतर शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.
नेत्र तपासणीनंतर चष्म्याचेही वितरण
डॉ. भारती पाटील यांनी नेत्र तपासणी कार्यक्रमाची माहिती दिली तालुक्यातील वीस ग्रामीण माध्यमिक शाळेमध्ये हा उपक्रम प्रथम टप्प्यात राबविला जाणार असून त्यात तज्ञकडून मुलांचे डोळे तपासून नंतर ज्यांना चष्मा असेल त्यांना चष्म्याचे देखील वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच ज्या मुलांना डोळ्यांच्या गंभीर तक्रारी आढळून येतील त्यांना पुढील उपचारासाठी मदत करण्यात येईल असे सांगितले.