दिनांक २३ सप्टेंबर २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व खा. शि. मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि.जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, “भारतीय संस्कृतीतील बदलती महिला” या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा पूज्य साने गुरुजी सभागृह, प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन श्रीमती देवयानी ठाकरे ( सदस्या,महाराष्ट्र महिला आयोग) यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मीना भोसले (अध्यक्ष,सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्था) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ.स्मिताताई वाघ (आमदार, विधानपरिषद) या भूषवणार आहेत व राजकारणात महिलांचा सहभाग व स्थान या विषयी मार्गदर्शन करतील. याप्रसंगी श्रोतावर्ग म्हणून तळागाळातील महिला तसेच बचत गटात कार्यरत असणाऱ्या महिला, महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी उपस्थित राहतील. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच्या या सत्रात ऍडव्होकेट ललिता पाटील व श्री रफिक शेख (डी.वाय. एस.पी) हे महिलांविषयी कायदे व कलमे याबाबत मार्गदर्शन करतील. त्यानंतर डॉ. स्वप्ना पाटील व डॉ. मयुरी जोशी या महिलांविषयीच्या आरोग्य विषयक समस्या व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करतील.दुपारी भोजनाच्या कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तराच्या सत्रात मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.