पाडळसरे धरणासाठी बजेट अधिवेशनात भरीव निधी देणार ः ना. जयंत पाटील

पाडळसरे धरणासाठी बजेट अधिवेशनात भरीव निधी देणार ः ना. जयंत पाटील

आमदार अनिल पाटलांच्या नेतृत्वातील  शिष्टमंडळास दिले ठोस आश्वासन

अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे धरणासाठी येत्या बजेट अधिवेशनात मागील वर्षी पेक्षा जादा भरीव निधी देण्याचे आश्वासन आमदारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीतील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास जलसंपदा मंत्री  जयंत पाटील दिल्याने कामाच्या प्रगतीच्या दृष्टीने पाडळसरे धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत.
पाडळसरे धरणासाठी मागील वर्षी १३५ कोटी भरीव निधी दिल्याने कामास गती मिळाली आहे, यावर्षी देखील भरीव निधी मिळावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री  जयंत पाटील यांच्याकडे सतत तगादा लावला होता. अखेर मंत्र्यांच्या तोंडून ठोस आश्वासन मिळावे यासाठी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचे मोठे शिष्टमंडळ सोबत घेऊन मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन काहीही करा पण आम्हाला धरणासाठी जादा निधी द्या असा आग्रहच धरला.  येत्या बजेटमध्ये आम्ही मागील वर्षी पेक्षा जादा निधी देणार आहोत याशिवाय धरणाच्या पूर्ततेसाठी जे जे करावे लागेल ते हे शासन केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, माजी संचालक बाजार समिती अमळनेर अनिल शिसोदे तसेच पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, प्रताप साळी, रणजित शिंदे, प्रा. सुनिल पाटील, नरेंद्र पाटील, अजयसिंग पाटील, हेमंत भांडारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आदिक्याचा प्रस्ताव १५ दिवसांच्या आत पाठवा

तसेच आमदारांनी यावेळी धरणाचे डिझाईन बदलल्याने त्याचे आदीक्यही वाढले मात्र या आदीक्यचा प्रस्तावास मान्यता नसल्याने धरणाच्या पिअर्सचे काम सुरू होत नाही अशी कल्पना मांडली. यावर मंत्रांनी तात्काळ तापी पाटबंधारे विभागाचे प्रमुख व कार्यकारी संचालकाना तेथूनच फोन करून आदीक्याचा प्रस्ताव १५ दिवसांच्या आत मंत्रालयीन स्तरावर पाठवून त्याची मान्यता घ्यावी जेणेकरून पिअर्सचे काम लागलीच सुरू होऊ शकेल तसेच धरणाच्या दृष्टीने जे काही तांत्रिक दोष असतील ते येत्या १५  दिवसाच्या आत तातडीची बैठक घेऊन दूर करावेत अश्या स्पष्ट सूचना करून शिष्टमंडळास दिलासा दिला.

मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधीची मागणी

अमळनेर तालुक्यातील मुडी व मांडळ फड बंधाऱ्यासाठीही निधी व प्रशासकीय मान्यता द्यावी जेणेकरून या परिसरातील गावांना जलप्रवाह उपलब्ध होऊन ग्रामिण जनतेला याचा विशेष लाभ होईल अशी मागणी आ.अनिल पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली या मागणीला देखील मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या बजेट अधिवेशनात यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही दिली.

 

आता खरोखर आशा पल्लवित झाल्या

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी व इतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आतापर्यंत धारणासाठी अनेक आंदोलने आम्ही केली,मुंबईच्या अनेक फेऱ्या मारल्या मात्र आतापर्यंत भाजप सरकार मधील कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला असा प्रतिसाद दिला नव्हता,त्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री जळगाव जिल्ह्याचे असतानाही त्यांनीही लक्ष दिले नाही,मात्र या भेटीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपला बराचसा वेळ आमच्यासाठी देऊन परिपुर्ण संवाद साधला,एवढेच नाही तर तुमचे आमदार दिसले म्हणजे आम्हाला धरण दिसते असे बोलूंन धरणाबाबत मोठी आस्था दाखवल्याने खरोखरच आमच्या आशा आता पल्लवित झाल्या असल्याची भावना सर्व कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *