आगीमुळे बोभाटा झाल्याने सिलिंडर पटापट उचलून इतरत्र लपवले
अमळनेर (प्रतिनिधी) बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या गांधीनगरच्या कोपऱ्यात असलेल्या अतिक्रमित दुकानात अवैध गॅस भरत असताना अचानक शार्ट सर्किट झाल्याने गाडीने पेट घेतला. याच चारचाकी पूर्ण जळून खाक झाली असून हे अवैध व अतिक्रमित गॅस भरणारे दुकाने एकदिवस शहराला पेटवेल, तेव्हाच नगरपालिकेला जाग येईल, का असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील बसस्थानकाच्या बाजूला जुन्या पोलीस लाईन बाहेर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहतात. याच ठिकाणी गांधीनगर च्या कोपऱ्याला अतिक्रमित दुकाने असून तेथे अवैधरित्या व्हँनमध्ये गॅस भरला जातो. मंगळवारी दुपारी १ वाजेला एका पांढऱ्या चार चाकीत बेकायदेशीर गॅस भरत असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने गॅस ने पेट घेतला व गाडीही पेटली. गाडीने पेट घेताच नागरिकांची पळापळ सुरू झाली तर त्याठिकाणी असलेले गॅस सिलिंडर देखील पटापट उचलून इतरत्र लपवण्यात आले. नगरपालिकेच्या अग्निशामक बंब आल्यानंतर आग विझवण्यात आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
अतिक्रमण हटाव पथक झोपले की काय ?
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघ करणाऱ्या दुकानदारांवर व सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईसाठी पुढे येत मर्दुमकी गाजवणाऱ्या नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला गांधीनगर येथे झालेल्या अतिक्रमित टपऱ्या तसेच तेथील अवैध व्यवसाय दिसत नाहीत, काय कि त्यांच्याकडूनच काही चिरीमिरी घेत आहे, असा संशय बळावला आहे. गाडीला आग लागली म्हणून या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला. वेळीच हे अतिक्रमण आणि अवैध व्यवसाय बंद न झाल्यास एक दिवस पूर्ण शहरच आगीच्या लपेटात जाईल, तेव्हाच या विभागाला आणि नपाला जाग येईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर प्रशासक म्हणून असलेल्या प्रांत आणि मुख्याधिकाऱ्यांनी ठरवले तर एका दिवसात हे अतिक्रमण निघेल, पण यासाठी त्यांची इच्छाशक्ती केव्हा जागे होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.