
अमळनेर (प्रतिनिधी) विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रताप महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने १४ डिसेंबरपासून काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. दि.१९ डिसेंबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून शासनाने दखल न घेतल्यास २० डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली आहे.
केंद्रीय वेतन आयोग बक्षी समितीच्या खंड २ च्या शिफारशी मान्य न करताच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पहिली व दुसरी कालबद्ध पदोन्नती योजना व दुसरी आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ घेत असलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय, रास्त, व हक्काच्या योजना रद्द केल्यामुळे सेवा निवृत्त झालेले कर्मचारी नियमित पेंशन पासून वंचित आहेत. त्यांच्यावर व कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शिवाय महाविद्यालयांतील कार्यरत कर्मचारी १०, २०, ३० वर्ष सेवा पूर्ण झाल्या नंतरची बक्षी समिती खंड दोन मधील सुधारित आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ शासन अमलात आणण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे. तसेच २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी. उर्वरित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे तात्काळ भरणे. ई. शासन दरबारी प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.