अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील दोन मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सावखाडाजवळ घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी असलेले गौरव पवार (वय २५ ) व अविनाश पाटील (१६ ) हे दोघे युवक दि.१२ रोजी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीने चोपडा रोडने पातोंडा येत असताना सावखेडा नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात गौरव पवार ह्या युवकाचा मृत्यू झाला तर अविनाश पाटील याच्या पायाला गंभीर दुखावत होऊन जखमी झाला. गौरव पवार हा अंत्यत हलाखीच्या कुटुंबातील घरातील कर्ता होता. वडील ह्यात नसल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर होती. तो राशी सिड्स फिल्ड कॉप अमळनेर तालुक्याचा प्रतिनिधी होता. मित्र परिवारात सर्व्यांचा लाडका व मदतीला तत्पर असणारा त्याचा स्वभाव होता. गौरव पवार याचे शवविच्छेदन करून सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्ता मुलगा गेल्याने आईने हंबरडा फोडला.तर अविनाश खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
खड्डे ठरताय अपघातास कारणीभूत
चोपडा ते सावखेडा रोडवर गेल्या कित्येक महिन्यापासून खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून ठिकठिकाणी खड्डेच खड्डे असल्याने वाहन धारकांची वाहने चालवायला नुसती तारांबळ उडते. वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. रात्रीच्या वेळी खड्डेच दिसत नसल्याने अपघात होत असतात. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत असतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.