अमळनेर (प्रतिनिधी) किराणा दुकानातून घेतलेली पाण्याची बाटली, कुरकरे व सिगारेटचे पैसे मागितल्याने तिघा दारूड्यांनी दुकानदाराच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून रक्तभंबाळ करीत चाकून बोट तोडल्याची घटना गांधलीपुरा भागातील लक्ष्मी टॉकीजजवळ शनिवारी ११ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या गांधलीपुरा भागातील किराणा दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र पाटील , यशवंत प्रकाश पाटील, विजय राजेंद्र पाटील हे तिघे दारू पिऊन आले. त्यांच्या हातात बियरची बाटली होती. त्यांनी पाण्याची बाटली, कुरकुरे आणि सिगारेट घेतली. त्यानंतर ते तिघे तेथून निघून जात असताना दुकानदार रवींद्र याने मालाचे पैसे मागितले. त्याचा राग येऊन तिघांनी त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी शेजारील दुकानदार रवींद्रचा भाऊ मनोज सैनानी आवरायला आला असता तिघांनी त्यालाही शिवीगाळ व मारहाण केली. आणि त्याचवेळी रोशनने हातातील बियरची बाटली रवींद्रच्या कपाळावर मारली. दुकानात घुसून दुकानाच्या मालाचे नुकसान केले. दुकानातून निघून जात असताना रवींद्रने यशवंतचा शर्ट पकडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने खिश्यातील धारदार चाकू काढून मधल्या बोटावर मारल्याने मधल्या बोटाचे पेरू तुटले. मनोजने अमळनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.