एमपीडीएचा आरोपी नगरसेवकाकडे आमदार रोहित पवार लावणार हजेरी..?
कार्यक्रमावरून राष्ट्रवादीत स्फोट होऊन उफाळून येतोय असंतोष
अमळनेर (खबरीलाल विशेष) वाळू माफिया म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या १० गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्याने थेट एमपीडीएची कारवाई होऊन फरार होऊन जेलची हवा खाणारा नगरसेवक श्याम पाटील याच्या कार्यक्रमाला चक्क कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार आज हजेरी लावणार आहे. याच नगरसेवक श्याम पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात अपप्रचार करून त्यांच्या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार आणि आमदार अनिल पाटील हजेरी लावणार असल्याने सच्च्या कार्यकर्त्यांची मोठी फौज नाराज झाली असून असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमावरून राष्ट्रवादीत मोठा स्फोट होणार आहे.
काही वर्षापूर्वी श्याम पाटील यांना कोणी ओळखत ही नव्हते. मात्र त्यांनी माजी आमदार साहेबराव दादा यांचे बोट धरले आणि हळूहळू पळायला सुरुवात केली. सुरुवातील वाळूचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून अवैध वाळू वाहूतक केल्याने वाळू माफिया म्हणून ओळख निर्माण झाली. तर याच गुन्हेगारी प्रवृत्तीतून श्याम पाटील यांच्यावर अवैध वाळू चोरीचे ४, सरकारी नोकरांवर हल्ला करणे २, गर्दी करून दंगल घडवून आणणे १, जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणे १ असे गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल झाले. तरीही त्याची हिंमत वाढत गेल्याने त्याला बाजूला करण्यासाठी बरोबरच त्यांची कुंडली तयार करीत एमपीडीएचा प्रस्ताव दाखल करून नांग्या ठेचण्याचा प्रयत्न झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देतातच महाशय तीन ते चार महिने फरार झाले. त्यानंतर अटक होऊन अंदाजे सहा महिने जेलमध्ये काढावे लागले. यातून बाहेर पडण्यासाठी माजी आमदार साहेबराव दादा यांचा बोट सोडून तत्कालीन विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा हात धरला. त्यानंतर एमपीडीएची कारवाई ढिली करून न्यायप्रविष्ठ होऊन तिला थोडी माईल्ड करण्याचा प्रयत्न करीत बाहेर पडले. या पुढे कोणत्याही उचापत्या न करण्याच्या अटीवर सध्या स्थितप्रज्ञासारखे आहेत.
काय आहे एमपीडीए कारवाई ?
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हात भट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकेदायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विना परवाना प्रदर्शन करणारी व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणारा. अशा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम सन १९८१ सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३ (३) अश्या प्रकारच्या कायद्याअंतर्गत एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. तेथून कारवाईचे आदेश पारित होतात. श्याम पाटलांवरही हीच कारवाई झाली आहे.
कार्यकर्ते राष्ट्रवादीला देणार घराचा आहेर, काळे झेंडे दाखवून निषेधाची मानसिकता !
माजी आमदार साहेबराव पाटील, शिरीष चौधरी यांच्याकडून फिरून येत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील याच्याविरोधात विष ओकत प्रचार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीने एमपीडीएची कारवाई झालेले श्याम पाटील यांचा राष्ट्रवादीशी काडीचाही संबंध नसताना त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे हजेरी लावत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली तर अनेक कार्यकर्ते हे त्यांनाच काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी आजचा फ्रायडे (शुक्रवार) हा गुड नव्हे तर बॅड फ्रायडे ठरणार आहे.
गुंडाला खतपाणी घालण्याचे काम….
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांना निवेदन देऊन रोहित पवार यांचा दौरा रद्द करण्याचे साकडे घातले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता एका गुंडाला खतपाणी घालण्याचे काम करीत असल्याची भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांना शरमेने मान खाली घालावी लागणार आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, माजी शहराध्यक्ष विनोद कदम, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, राकाँ. जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, पं.स.सदस्य प्रवीण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, शहराध्यक्षा अल्का पवार, माजी शहराध्यक्षा आशाबाई चावरिया, कविता पवार, नगरसेवक रामकृष्ण पाटील, विवेक पाटील, गायत्री पाटील, योगेश्वर पाटील, माजी शहराध्यक्ष रणजीत पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष नीलेश देशमुख, युवक जिल्हा उपाध्यक्ष गोविंद बाविस्कर, संजय गांधी निराधार समिती सदस्य दीपक पाटील, जिला उपाध्यक्ष इमरान खाटीक, विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी, शहर कार्याध्यक्ष सनी गायकवाड, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष राहुल गोत्राळ, बाळा महाजन, नितीन पाटील, पप्पू कलोसे, रफीक मिस्तरी, उमेश सोनार, सचिन वाघ, मुशीर शेख आदींच्या सह्या आहे.
भविष्यात राष्ट्रवादीला नडणार
मुळात पवार घराण्याची पंरपरा उज्वल असतानाही एमपीडीएच्या आरोपीच्या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भविष्यात राष्ट्रवादीला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. विद्यमान आमदार अनिल पाटील यांची पत्नी नगराध्यक्ष असताना असाच एक नगरसेवकांचा गट फुटून शिरीष चौधरींना जाऊन मिळाला होता. त्यानंतर शिरीष चौधरी यांनी नगरपालिका ताब्यात घेऊन विधानसभा निवडणूक जिंकून घेतली होती. म्हणून या कार्यक्रमातून याची पुनरावृत्ती होऊन पुन्हा बाहेरचा कोणीतरी येऊन आमदार होईल, हेही नाकारता येणार नाही. म्हणून राष्ट्रवादी स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असल्याचे बोलले जात आहे.
दोंडाईच्याचा फायनांसर, आमदारकीचे स्वप्न
श्याम पाटील हे ठेकेदारी करतात. त्यांना दोंडाईचा येथील एक फायन्सांरचे पाठबळ असल्याने ते नगरसेवक पदावरून थेट आमदारकीचे स्वप्न पाहू लागले आहेत. त्यांच्या बगल बच्च्यांनाही श्याम भाऊ एक दिवस आमदार होतीलच अशी स्वप्न पडू लागली आहेत. साहेबराव दादा, शिरीष चौधरी यांना सोडून आता आमदार अनिल पाटील यांनी श्याम पाटील यांना जवळ केले आहे. त्यामुळे ठेकेदारी आणि अवैध मालमत्ता बनवून आमदारकीचे स्वप्न ते पाहत आहे.
…तर ‘खबरीलाल’कडून स्वागतच
‘खबरीलाल’ नेहमीच सडेतोड आणि बेधडक वृत्त प्रसिद्ध करीत असल्याने अनेक बगलबच्चे नाराज होतात. यातून ते ‘खबरीलाल’ला अंगावर घेण्याचे मनसुबे बांधत असतात. असे मनसुबे बांधणाऱ्यांचे खबरीलाल नेहमीच स्वागत करतो. तसेच अंगावर आले तर शिंगावर घेण्याची तयारी ही ‘खबरीलाल’ ठेवतो.
सडेतोड आणि परखड मांडणी… Best 👍🏼
निर्भीड पत्रकारीतेचे मूर्तिमंत उदाहरण …..👌👌👍🐅🐅