अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटलांना बैठकीत सूचना
अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोळा, गणेशोत्सवात गावातून कोणतीही मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यासाठी पोलिस पाटलांची भूमिका महत्वाची असून त्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्या.
अमळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी सण-उत्सव पोळा व गणपती उत्सव तसेच पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या. तसेच सोमवारी साजऱ्या होणाऱ्या पोळा सणानिमित्त कुठल्याही प्रकारच्या वाद्य वाजंत्रीसह किंवा साधी मिरवणूक देखील निघणार नाही, असे सांगण्यात आले.
मंडळांनी ४ फूटाचीच गणेश मूर्ती बसवावी
सार्वजनिक गणपती तसेच गावातील सार्वजनिक मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपती उंची ही जास्तीत जास्त २ फूट राहील तसेच गणपती स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही. अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना गावात जास्तीत जास्त एक गाव एक गणपती बसविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.