तीन जण जखमी, बापानेच दिली मुलाविरुद्ध कार नुकसानीची फिर्याद
अमळनेर (प्रतिनिधी) जीवघेण्या ठरत असलेल्या तालुक्यातील मंगरूळ येथील दुभाजकावर दोन पुन्हा कार धडकल्या आहेत. यात तीन जण जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असून बापानेच मुलाविरुद्ध कार दुभाजकावर आदळल्याची फिर्याद दिली आहे. हे अपघात ४ रोजी रात्री व ५ रोजी सकाळी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे चोपडा राज्य मार्ग १५ वर असलेल्या मंगरूळ गावाजवळ स्व अंबर राजाराम पाटील माध्यमिक शाळेजवळ दुभाजकाला रिफ्लेकटर, विद्युत दिवे नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात दुभाजक दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. रविवारी पहाटे कार (क्रमांक एमएच- १९ , एडब्ल्यू- १००१) ही दुभाजकावर आदळली. या अपघातात वाहनाचे नुकसान होऊन तीन जण जखमी झाले आहेत. यात विठ्ठल नथू सोनार (रा. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा दिनेश सोनार याने कारमध्ये मित्रांना फिरायला मुंबई घेऊन गेला होता. ५ रोजी पहाटे ३ वाजता त्याने मंगरूळ गावाजवळ दुभाजकाला वाहनाची धडक लावल्याने तो स्वत व त्याचे मित्र कांतीलाल कावडे, दिनेश पाथरीया यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरला आहे. तपास कैलास शिंदे करीत आहेत.
दुसरे वाहनही आदळले
तर ४ सप्टेंबर शनिवारी रोजी रात्र चारचाकी (क्रमांक एमएच- १९, ६७७६) ही देखील दुभाजकावर आदळली. दहा दिवसांत याच दुभाजकावर चार अपघात झाले आहेत. तर आतापर्यंत १९ अपघात झाले असून रस्ता धुळे सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत झाला असल्याने अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप वाहनचालक करीत आहेत.