पश्चिम उत्तर भागातील मारवड मंडळातील शेतकऱ्यांची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) यंदा तालुक्यातील पश्चिम उत्तर भागात मारवड मंडळात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट उभे आहे. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करून पीकविमा व दुष्काळी मदत तात्काळ मिळावी या मागणीसाठी मारवड मंडळातील शेतकऱ्यांनी बुधवारी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांना निवेदन देऊन मागणी केली.
अमळनेर तालुक्यात जून, जुलै दोन महिने होऊनही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी बांधवांना तात्काळ पीकविमा व दुष्काळी मदत जाहीर करा यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,मारवड मंडळात संबंधित अधिकारी यांनी पिकांची पाहणी करावी. शासनाचा निकषाप्रमाणे तात्काळ पीकविमा बाबत कार्यवाही करून शेतकरी बांधवांना पीकविमा देण्यात यावा. याबरोबर दुष्काळी अनुदान (मदत)देण्यात यावी यासाठी निवेदन देतांना मारवड मंडळातील शेतकरी दिलीप पाटील, जिजाबराव पाटील,न्यानेश्वर पवार,बापू महाले उपस्थित होते.
आत्तापर्यंत केवळ ४५ मिलिमीटर पाऊस
शेतकरी बांधवानी खरीप हंगामाची पूर्ण तयारी करून अगदी रिमझीम पावसात लागवड व पेरण्या केल्या होत्या. मात्र तालुक्यातील मारवड मंडळासह तालुक्यातील पश्चिम व उत्तरेला एक नाही तर तिबार पेरणीचे संकट शेतकरी बांधवासमोर उभे राहिले आहे. मागील महिन्यातील एक जून ते सत्तावीस जुलै पर्यंत अगदी आत्तापर्यंत केवळ ४५ मिलिमीटर पाऊस झाला असून तोही रिमझिम झाल्याने हजारो रुपयांचे बियाणे टाकूनही पावसाच्या हुलकावणी ने पुन्हा पेरणी व लागवड करावी लागली. मात्र त्यानंतर ही पाऊस न झाल्याने पुन्हा तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे.