दोन अभियंते लाचखोरीत अडकल्याने ढुंगणाला दोन्ही पाय लावून काढला पळ
लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने पडणार उघडा
अमळनेर (खबरीलाल विशेष) अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते लाच घेताना अडकल्याने अमळनेर बांधकाम विभागाच्या कामांच्या गुणवत्तेत आणि टक्केवारीत मोठीच घाण करून ‘एक्झिकेटिव’ असलेले एम. एस. राजपुत यांनी पद्धतशीरपणे अमळनेरातून ‘एक्झिट’ घेत ढुंगणाला दोन्ही पाय लावून पळ काढला आहे. सुटलो बुवा असा सुटकेचा निश्वास त्यांनी टाकला असला तरी लाचलुचपत विभागाचा ससेमिरा आणि खबरीलालच्या वॉचने ते लवकरच उघडे पडणार आहेत. त्यांच्यासह त्यांचे पिट्टू असलेल्या जेईंची एक-एक प्रकरणे खबरीलालच्या हाती लागले असून अमळनेरकरांसह जिल्ह्याला त्यांनी कसे लुटले आहे, याचा लेखाजोगा सविस्तर जनतेसमोर आणणार आहोत.
अमळनेर येथील उपविभागीय अभियंता वर्ग १ दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधलीकर यांना २ लाख ५८ हजाराची लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात अमळनेरच्या बांधकाम विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली. याबाबत खबरीलालने वृत्त मालिका लावून या विभागात सुरू असलेली टक्केवारी, भ्रष्ट एक्झिकेटिव एम.एस. राजपूत यांची कुंडली उघड केल्याने वरिष्ठांनी याची दखल घेऊन त्यांना एक्झिट होण्यास भाग पाडले, असे बांधकाम विभागातीलच सूत्रांनी सांगितले. यामुळे खबरीलालची वृत्त मालिका खरी ठरली. परंतु या विभागातील छोटे मासे गळाला लागले आणि मोठा मासा हा डकारही न देता पद्धतशीरपणे पाणी गढूळ करून दुसऱ्या तळ्यात जाणार आहे. कारण एक्झिकेटीव असलेल्या एम.एस.राजपूत यांच्या संमतीशिवाय हे अधिकारी हे ऐवढी मोठी लाचेची रक्कम मागू शकत नाही, हे सर्वांना कळत असले तरी ईनपाईप ते न अडकल्याने त्यांनीही आता अमळनेरातून पद्धतशीरपणे काढता पाय घेतला आहे.
राजपूतांनी पदभार दिला कसा ?
एक्झिकेटीव अभियंता एम.एस. राजपूत यांना अमळनेरात जास्त वर्ष झाल्याने त्यांनी नंदुरबार जिल्हयातील शहादा येथे बदली करून घेतली होती. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने यापेक्षा अधिक धुता येईल, म्हणून त्यांनी बदलीसाठी दिलेल्या मिठाईची चर्चा जोरात होती. परंतु त्यांची बदली होऊनही ते अमळनेरात कसे थांबले ? ते शहादा येथे का रुजू झाले नाहीत? अमळनेरात अधिकृत थांबले की अनधिकृत थांबले ? ज्या काळापर्यंत थांबले तेवढ्या काळात त्यांनी किती धुतले ? याची चौकशी आता होणे गरजेचे आहे. तर याप्रकरणात ‘खबरीलाल’ने खोलवर तपास केल्यावर राजपूत यांना शहादा येथील लोकप्रतिनिधीने न स्वीकारता आपल्या पावली माघारी पाठवले होते. त्यामुळे राजपूतानीही आल्या पावली माघरी येत जेवढे धुता येईल तेवढे धुवून आता काढता पाय घेतला आहे.
राजपूतांच्या मंत्रालयात चकरा
राजपूत यांना बदली होऊनही शहादा येथूनही माघारी फिरावे लागले, अमळनेरात लाचप्रकरणी बदनामी झाली आणि आता पदभार सोडल्याने आता त्यांची घर का ना घाट का अशी स्थिती झाली आहे. तसेच त्यांचा प्रमोशनचाही ड्यू आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रालयात सेटिंगसाठी चकरा सुरू झाल्या आहेत. मागील प्रमोशनहीही एका प्रकरणामुळे असे अडकले होते. तर आता लाचखोरीचा धब्बा बसल्याने स्वतःला क्लिन साबित करण्यासाठी आणि प्रमोशनसाठी मंत्रालयात त्यांच्या वाऱ्या सुरू झाल्या आहेत. पण हपाहपाचा माल गपागपा खाल्याने त्यांना प्रमोशन आणि चांगली कार्यालय भेटणे मुश्लिकल असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘खबरीलाल’शी बोलताना सांगितले.
मी नाही त्यातली कडी लावा आतली !
राजतपूत हे अमळनेरात खटारा गाडीचा वापर करून आपण धुतल्या तांदळाचे असल्याचे भासवत होते. परंतु त्यांनी अमळनेरात मोठ्या प्रमाणावर माया जमवली आहे. नाशिकमध्ये त्यांचा मोठा बंगला आहे. त्यांच्याकडे महागड्या आणि आलिशान अशा गाड्या घोड्या आहेत. या संपत्तीची विल्हेवाट त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या नातेवाईकामध्ये व्यवस्थित लावली आहे. म्हणून त्यांचे मी नाही त्यातली आणि कडी लावली आतली, असा कारभार होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे व नातेवाईकांच्या उत्पन्नाचे साधन काय, ऐवढी संपत्ती त्यांनी कशी गोळा केली, याचीही त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नियमानुसार चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आता होत आहे.
‘एक्झिकेटिव’ बांधकाम विभागात आता ठाकूरकी !
एम.एस.राजपूत यांनी आपला पदभार धरणगाव बांधकाम विभागाचे उपअभियंता मुकेश ठाकूर यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे बांधकाम विभागात आता राजपूत राज जाऊन ठाकूरकी सुरू होणार आहे. मुळात अमळनेरचे बांधकाम कार्यालय लाचप्रकरणामुळे बदनाम झाले आहे. त्यात येथील बहुतांश जेई राजपूत यांचे पिट्टू असल्याने ते आता मुकेश ठाकूर यांची ठाकूरकी किती चालू देतात याकडे लक्ष लागून आहे.
तक्रारीचा खबरीलालकडून पाठपुरावा !
दरम्यान, अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एम.एस. राजपूत यांचीही चौकशी करण्यातबाबत खबरीलालने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांसह नातेवाईकांच्या उत्पन्नाची आणि त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीचा खबरीलालकडून पाठपुरावा सुरू असल्याने लवकरच चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.