गुरांचा ट्रक जाळून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक व मोडतोडप्रकरणी ११ जणांना ठोठावली शिक्षा

चोपडा यावल रोडवर घडली होती घटना, अमळनेर न्यायालयात सुरू होत कामकाज

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा शहरात २०१६ मध्ये गुरांचा ट्रक जाळून पोलिसांच्या वाहनांवर दगड फेक व मोडतोड करून ५ लाखाचे नुकसान केल्याची घडली होती. या प्रकरणी चोपडा येथील ११ जणांना अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली.

        या बाबत अधिक माहिती अशी की, १३ जून २०१६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चोपडा यावल रोडवर ट्रक (क्रमांक एम पी १४ , एच बी १३२७ )मध्ये ४० गुरे वाहून जात असल्याने सुमारे १०० ते १५० लोकांनी जमाव जमवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला, म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील , ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केदार , अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे , सहाययक फौजदार वसंत चव्हाण यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा  हजर झाला  त्यावेळी तेथील जमावाने घोषणाबाजी सुरू केली. जमावाला हटकायला गेले असता जमावाने दगडफेक सुरू केली.  त्यात वसंत चव्हाण यांना डोक्याला दगड लागून जखमी झाले. सपोनि आर. एन. पवार , पोलीस उपनिरीक्षक शिंदे विजय निकम, उमेश धनगर , अजय पाटील यांच्या हातापायाला दगड लागून ते जखमी झाले. त्याच वेळी जमावतील अक्षय महाले व दादू जगन पारधी यांनी हातात जळता टेम्भा आणून ट्रक (एम पी १४ , एच बी १३२७) ला आग लावून ट्रकचे ५ लाख रुपयांचे नुकसान केले आणि चालक नहारू महंमद हुसेन वय ३५ रा बोतलगंज मध्यप्रदेश , व क्लीनर मंजूर शकुर हुसेन याना मारहाण केली. त्यावेळी आवरायला गेलेल्या किरण पाटील या पोलिसाला देखील जमावाने मारहाण केली आणि अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गाडीवर दगडफेक करून  काचा फोडून नुकसान केले. तसेच गाडीतील ११ गोऱ्हे सोडून दिले आणि यावल रोडवरील मिश्किलशहा बाबा दर्ग्यावरील चादरी जाळून टाकल्या. या प्रकरणी वसंत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ३५ लोकांविरुद्ध दंगल , जाळपोळचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपस किसन नजन पाटील यांनी केला होता. हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. यात सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी १४ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी वसंत चव्हाण , जखमी पी एस आय पंकज शिंदे , डॉ. पंकज पाटीक , डॉ. तृप्ती पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून भैय्या मंगल पाटील , अजय दिलीप जैन , राजेंद्र उर्फ दादू जगन पारधी , गोविंदा रवींद्र सोनार , अर्जुन भगवानसिंग परदेशी , अक्षय रवींद्र महाले , राकेश उर्फ दीपक मगन मराठे, योगेश सतीश चित्रकथी जाधव ,सोनू उर्फ रवींद्र आसम्बर चौधरी , कैलास देवीदास वाघ , अंकुश नामदेव पाटील( सर्व रा चोपडा)  याना न्या. व्ही. आर. जोशी यांनी चादर जाळल्याप्रकर्णी कलम ४३५ प्रमाणे ३ वर्षे शिक्षा, २ हजार रुपये दंड , तसेच पोलिसांचे वाहन तोडफोड प्रकरणी कलम ३५३ व ३३२ नुसार २ वर्षे  शिक्षा , कलम १४७ नुसार १ वर्षे शिक्षा , कलम २९५ नुसार 1 वर्षे शिक्षा ,४२६ नुसार २ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *