शनिवारी प्रमथ स्मृतिदिनानिमित्ताने अमळनेरात सर्वपक्षीय स्मृती सभा
अमळनेर (प्रतिनिधी) जिल्हा भाजपाचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष उदय भिकनराव वाघ यांचा शनिवार दि.२८ नोव्हेंबर रोजी प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमातून प्रतिमपूजन होऊन त्यांना आदरांजली अर्पण करीत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. तसेच सर्वपक्षीय सभा होणार आहे. यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वाघाप्रमाणेच आपले अस्तित्व उदय वाघ यांनी निर्माण केले होते. तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत लोकप्रिय ठरलेले आणि राजकीय क्षेत्रात संघटन, विकास, वक्तृत्व आणि नेतृत्व हे गुण त्यांना अवगत होते. म्हणून त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. डांगर बु. सारख्या छोट्याशा गावातून जन्मले असताना उदय वाघ यांनी आपल्या कौशल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यांतच नव्हे तर धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यापर्यंत राजकीय वर्तुळात नावलौकिक मिळवले होते. अमळनेर शेतकी संघ संचालक, जळगाव जिल्हा बँक संचालक, जिल्हा दूध संघ संचालक, दोनदा जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष आणि अमळनेर बाजार समिती सभापती अशा पदांवर त्यांनी मजल मारली, त्यांना पत्नीच्या रूपाने स्मिताताई वाघ यांची खंबीर साथ असल्याने तीनदा जि. प. सदस्य, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश चिटणीस आणि विधानपरिषद आमदार अशी अनेक मोठी पदे स्मिताताईच्या साथीने मिळाली. राजकारण करताना काही चांगलं झालं तर उडायच नाही आणि वाईट झालं तर खचायचे नाही हीच त्यांची खासियत होती, चळवळीतुन गेलेले कार्यकर्ते असल्यांने संघर्षाने कधीही त्यांचा पिच्छा सोडलाच नाही, अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी त्यांची धरपड मोठी होती, बाजार समितीला नवे रूप देण्यात ते यशस्वी ठरले, पांझरेतून चिखली व माळन नदीजोड प्रकल्प हे त्यांचे स्वप्न होते. तसेच जिल्ह्यात प्रथमच अमळनेर तालुक्यात तालुका दूध संघास मंजुरी त्यांनी मिळविली, अजूनही स्मिताताई हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत,अशा महत्त्वाकांक्षी नेत्यास शनिवारी सामूहिक श्रद्धांजली साठी स्मृती सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
असे होणार नामकरण सोहळ्यासह विविध कार्यक्रम
त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी अमळनेर येथे सायंकाळी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील ट्रक टर्मिनसच्या भव्य प्रांगणात सर्वपक्षीय स्मृती सभा होणार आहे. याठिकाणी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तर सकाळी जिल्ह्यातील अनेक गावांसह अमळनेर तालुक्यातील विविध गावात प्रतिमपूजन होऊन सामूहिक आदरांजली वाहिली जाणार आहे. अमळनेर शहरात देखील चौकाचौकात प्रतिमा पूजन होणार आहे. त्यांच्या डांगर बु. या गावी संपूर्ण गाव एकत्र येऊन आदरांजली वाहणार आहे. ते वाचन प्रेमी व वाचनाच्या चळवळीला चालना देणारे असल्याने त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून दोधवद येथे सार्वजनिक वाचनालयात अँड व्ही आर पाटील यांच्या संकल्पनेतून स्व उदय वाघ यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार आहे, तर रडावन येथे सार्वजनिक व्यायाम शाळेस उदय वाघ यांचा नामकरण सोहळा होणार आहे.