अमळनेर (प्रतिनिधी) माळण परिसर रणाईचे फार्मर्स प्रोड्युसर लिमिटेड या कंपनीच्या पशुखाद्य विक्री केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) पॉपी प्रकल्पांतर्गत ही कंपनी उभारण्यात आली असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
उद्घाटन कायर्क्रमप्रसंगी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे, जळगाव पीपल्स बँकेच्या व्यवस्थापिका दप्तरी, ग्रामविकास अधिकारी राजेश पाटील, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष भटू पाटील, राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्थेचे तुषार पाटील, मारवड विकास मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी योजनेत, ग्रामीण भागातील कृषी आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी गावपातळीवर पीकनिहाय क्लस्टर निवड करून शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेबरोबरच प्रशिक्षण, अभ्यास दौरे, व्यवसाय आराखडा, बाजार जोडणी, शासकीय योजनांचा आणि वित्तीय संस्थांबरोबर समन्वय आदी मुद्द्यांवर सहकार विकास महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. यात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेती उत्पादन व विक्री या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या वेळी कंपनीचे संचालक भाईदास नागो पाटील, राजेंद्र शामराव पाटील, भास्कर उत्तम पाटील, कलाबाई अभिमन्यू पाटील, विलास पाटील आदी उपस्थित होते. तर यासाठी माळण विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्याचबरोबर कंपनीचे सभासद तातडीने होऊन शेअर्स खरेदी करून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन माळण विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
सोलर प्रकल्पासह डाळी स्वछता व पोहोच मार्केटिंग प्रकल्पही राबवणार
आगामी काळात या कंपनी मार्फत जलसिंचनाबाबत पाणी वापर संस्था, उपसा सिंचन योजना माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आगामी काळात २ मेगा व्हॅट क्षमतेचा सोलर प्रकल्पासह डाळी स्वछता व पोहोच मार्केटिंग प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामग्रीसह नवीन उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीद्वारे करण्यात येणार आहे.