आमदार अनिल पाटील यांना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आश्वासन
अमळनेर(प्रतिनिधी) दिवाळी सण तोंडावर येऊनही शासकीय कापूस खरेदी केंद सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचा विचार करून अमळनेर तालुक्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुंबई येथे केली आहे. त्यावेळी त्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
मंत्री बाळासाहेब पाटील यांची मुंबईत भेट घेऊन आमदार पाटील यांनी तालुक्यातील सध्या परिस्थिती सांगितली. त्यात अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात यावर्षी ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असून त्यापासून अंदाजे २२ लाख ८० हजार क्विंटल कापूस उत्पादित होत आहे. अद्याप पावेतो अमळनेर क्षेत्रात कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्याने अमळनेर येथे रोज शेकडो शेतकरी कापूसकेंद्र सुरू झाले का..? या चौकशीसाठी येत असतात.
अमळनेर कार्यक्षेत्रात ५ जिनिंग कार्यरत
अमळनेर कार्यक्षेत्रात आजघडीला ५ परवानाधारक जिनिंग असुन शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी तात्काळ व वेगाने व्हावी व सदर योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा यासाठी जास्तीत जास्त शासकिय जिनिंग केंद्र तालुकास्तरावर सुरु करावे. यामुळे तालुक्यातील साधारणतः ७० हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल तरी योग्य कार्यवाहीसाठी तात्काळ आपण संबंधित पणन विभागाला आपल्या स्तरावरुन आदेश देऊन शेतकऱ्यांना कापूस विक्री करता येईल व दिवाळी हा सण जोरात साजरा करता येईल अशी अपेक्षा भेट घेऊन केली आहे. यावेळी पणन व सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ग्रेडर उपलब्धता कमी असून अमळनेर तालुक्यासाठी ग्रेडर उपलब्ध करून त्वरित कापूस खरेदीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश केले. त्यामुळे लवकरात लवकर अमळनेर तालुक्यासाठी खरेदी केंद्र सुरू होणार आहे.