तांदळी येथील अश्विनी आणि निलेशच्या प्रेम विवाहाची कहाणी ठरली क्षणभंगुर
अमळनेर (प्रतिनिधी) नजरसे नजर मिली.. दिलसे दिल मिला.. प्रेमाच्या आणाभाका घेत एकमेकांसाठी जिवाला जीव देण्यास तयार झाले… कपीलेश्वरच्या साक्षीने प्रेम विवाहात अडकले… आणि काही दिवसातच कौटुंबिक कलह सुरू झाल्याने अश्विनी आणि निलेशच्या प्रेम विवाहाची कहाणी क्षणभंगुर ठरली.. ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला त्यानेच लाकडी दांडक्याने मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला… आणि तिच्या जिवाचा थरकाप उडाल्याची थरारक घटना २२ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील तांदळी येथे घडली…
तांदळी येथील अश्विनी रामदास पाटील ( वय १९ ) आणि गावातीलच निलेश प्रतापसिंग परदेशी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. दोघेही आंतरजातीय असले तरी त्यांचा कपीलेश्वर मंदिरावर प्रेम विवाह झाला होता. मात्र २२ रोजी अश्विनीची जेठाणी आशाबाई उदयसिंग परदेशी ही किचनमध्ये येऊन तू आमच्या जातीची नाही , ठेवलेली आहे अशा प्रकारची अश्लील शिवीगाळ अश्विनी व तिच्या आईला करीत होती. त्यावेळी पती निलेश परदेशी हा देखील शिवीगाळ करू लागला. सासू देवकाबाई देखील शिवीगाळ करू लागली आणि लाकडी दांडक्याने तिला पाठीवर , डाव्या हाताच्या खांद्यावर मारू लागला. त्यावेळी दोघांनी हिला जाळून टाक असे सांगितल्याने पती निलेश याने डिझेलचा डब्बा आणून अंगावर टाकले आणि फ्रीज वरील माचीस आणण्याचा प्रयत्न केला असता अश्विनीने दोघांना जोराचा धक्का मारून घरातून पळ काढून बाहेर ओट्यावर आरडा ओरडा करू लागली. त्याचवेळी पती निलेशचा गोवर्धन येथील मित्र निलेश पाटील व तांदळी येथील अजय मधुकर परदेशी तेथे आले. पतीने त्यांना संगीतल्यावरून दोघांनी अश्विनीला ओढत तिच्या आई वडिलांच्या घरी नेले. त्याचवेळी पती पाठीवर मारत होता. अश्विनीला तिच्या आई वडिलांकडे सोडून तिच्या आई वडिलांनादेखील शिवीगाळ केली. म्हणून अश्विनीने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून जीवे मारण्याचा प्रयत्न , अश्लील शिवीगाळ , मारहाण केल्याचा गुन्हा पती ,जेठाणी , सासू व पतीच्या दोन मित्रांविरुद्ध दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.