चाहत्यांना हार, पुष्पगुच्छ भेटवस्तू ऐवजी किराणा साहित्य आणण्याचे आवाहन
अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तुंवर खर्च न करताना कोरोनामुळे हालाकीत जीवन जगणाऱ्यांना किराणा कीट वाटपासाठी पुढाकार घेतल्यास याच साथी माजी आमदार पाटील यांना लाखमोलाच्या शुभेच्छा असतील. त्यामुळे यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिवांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
अमळनेर परिसरात आजही खान्देशची मुलूख मैदान तोफ म्हणून माजी आमदार गुलाबराव पाटील सुपरिचित आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक चाहते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला भेटवस्तू व पुष्पहार, गुच्छ देण्यासाठी घरी येतात. परंतु यंदा अशा सर्व चाहत्यांनी कोरोना साथीत ज्या गरीब कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे, ज्यांचा रोजगार गेलेला आहे, त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कोणतीही जाहिरात न करता ६५० रुपयांचे जीवनावश्यक किराणा किट घरपोच उपलब्ध करून देत आहेत, अश्या कार्यकर्त्यांना किट वाटपासाठी घेऊन दिले तरी माजी आमदार पाटील यांना शुभेच्छा मिळाल्यासारखे आहे.
साने गुरुजी विद्या मंदिर येथे शुभेच्छा रुपी किराणा साहित्य स्विकरणार
ज्यांना अशी सेवाभावी मदत करायची आहे त्यांनी साने गुरुजी विद्या मंदिर येथे शुभेच्छा रुपी किराणा साहित्य आणून दिल्यास स्वीकारले जाईल, असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. या सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी संबंधित सक्रिय कार्यकर्ते संदीप घोरपडे, पवार, भास्कर बोरसे, रणजित शिंदे, बन्सीलाल भागवत, प्रशांत निकम, चेतन शहा, शुभम निकम यांच्याकडेही वस्तू किंवा रोख स्वरूपात जमा केल्यास गरजू कुटुंबीयांपर्यंत किराणा किट पोहोचवला जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.