वधू-वर पित्यांचे समुपदेशन करून बालविवाह कायद्याची दिली माहिती
अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील लोणे येथे शुक्रवारी सुरू असलेला बालविवाह अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत रोखला. विविदा थांबण्यास वधू-वर पित्यांनी मान्यता दिल्याने त्यांना समज दिला. त्यामुळे याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
तालुक्यातील लोणे (भोणे) येथील भिवदास सोनू अहिरे यांचा मुलगा समाधान (वय १८) आणि निलचंद गायकवाड (रा.चांदसर, ता.धरणगाव) यांची मुलगी ज्योती (वय १७) यांचा विवाह सोहळा लोणे येथे शुक्रवारी सुरू होता. याबाबत प्रशासनाला माहती मिळाल्याने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांनी ग्रामसेवक नरेश सूर्यवंशी, पोलिस पाटील पुना पाटील, सरपंच कविता पाटील, पोलिस शिपाई गायकवाड हे विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी विवाह बद्दल शहानिशा केली असता वरपित्याने वर-वधू अल्पवयीन असल्याचे मान्य केले. त्यानुसार संरक्षण अधिकारी चौधरी यांनी बालविवाहाबाबत समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्याची उपस्थितांना माहिती दिली. परिणामी वर व वधू अल्पवयीन असल्याने बालविवाह थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा न दाखल करता समज देण्यात आली.