अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात बांधकाम व्यवसायातून अडीच ते तीन हजार लोकांच्या घरातील चूल रोज पेटत असते. मात्र या व्यवसायाचा मूळ पाया असलेल्या रेतीवर गंडांतर येते. शासन आणि स्थानिक प्रशासनाचे धोरण याला कारणीभूत आहे. हीच रेती शेजारील राज्यातून चारपट भावाने आणावी लागत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्याची हक्काची रेती तालुक्याला वर्षभर वाजवी दरात ऊपलब्ध करून द्यावी, आशी मागणी बांधकाम व्यावसायिक सरजू जी.गोकलाणी यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी केली आहे.
स्थानिक प्रशासन आपल्या येथील रेतीचा लिलाव वर्षातून फक्त तीन महिन्यासाठीच करतात. मात्र शेजारील राज्यात हाच लिलाव संपूर्ण पाच वर्षासाठी असतो. पर्यायाने अमळनेर तालुक्यातील सर्व बांधकाम व्यावसायिक शेजारील राज्यातून रेती चार पट जास्तीचे दर मोजून खरेदी करतात. आपल्या येथे रेती काढण्यासाठी बोटींचा वापर करण्यास परवानगी नाही. कारण काय तर पर्यावरणाची हानी होते. तेच मात्र शेजारील राज्यात रेती काढण्यासाठी सर्रास बोटी वापरण्यात येतात. तेव्हा तेथे पर्यावरणाची हानी होत नाही का ? असा प्रश्न आपसूकच निर्माण होतो.