अमळनेर (प्रतिनिधी) सुरतला लग्नाला गेलेल्या इस्लामपुरा भागातील महिलेच्या घरात गल्लीतीलच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी तपासचक्रे फिरवून तिघा आरोपीना २४ तासात अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
समीना परवीन शेख या २४ डिसेंबरपासून तीन दिवस सुरत येथे लग्नाला गेले असताना अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून त्यांच्या घरातील २२ हजार रुपये रोख व २२ हजार ५०० रुपयांचे साडे सात ग्राम सोने असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. तसेच घरातील युनियन बँकेचे व पीपल्स बँकेचे ए टी एम कार्ड व इतर वस्तू देखील चोरल्या. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध भादवी ४५४,४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
एटीएम कार्डवरून पासवर्ड शोधून बँकेतूनही चोरटय़ांनी काढले पैसे मात्र चोरटे एव्हढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एटीएम कार्ड वरून पासवर्ड शोधून बँकेतून पैसे देखील काढले. जिल्हा पोलिस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षकांनी पैसे कोठून गेले याची माहिती काढली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सहाययक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्यासह पोलीस नाईक रवी पाटील , योगेश बागुल , शरद पाटील , दीपक माळी , किशोर पाटील या पथकाला आरोपींचा मागोवा घ्यायला लावला. आरोपीनी एचडीएफसी व आयसीआयसीआय बँकेतून १६ हजार ८०० व दोन वेळा १६ हजार ५०० रुपये काढले होते. सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्यांचे भ्रमणध्वनी लोकेशन घेऊन त्यांचा शोध घेतला असता इस्लामपुरा भागातच राहणारे जिशान खान आरीफखान (वय १९ वर्षे) , मोईन शेख करीम शेख (वय १९) हे गल्लीतील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिसरा आरोपी जयेश रवींद्र बोरसे (वय १८ रा. धार ता. अमळनेर) हा धुळे येथे आढळून आला.
तिघांनी बँकेतून काढलेल्या पैशातून
नवे मोबाईल घेऊन मारली मजा
तिघांनी बँकेतून काढलेल्या पैशातून नवे मोबाईल घेतले होते. जयेशला पोलिसांनी धुळ्याहून अटक केली. तिघा आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्या. विश्वास वळवी यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.