अमळनेर (प्रतिनिधी) धाडधाड धावणाऱ्या रेल्वेतच गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिच्या पतीसह आजूबाजूच्या प्रवाशांचीही धांदल उडाली. धावणारी रेल्वे आणि प्रसूती कळाने विवहळणारी महिला पाहून सर्वांच्याच्या काळजाचे धस्स झाले, पण आजूबाजूच्या आयाबायांनी प्रसंगावधान राखत महिलेला रेल्वेच्या स्वच्छतागृहात नेले. डॉक्टर नाही की कोणी नर्स नाही, आणि रेल्वेही धावत होती. काय होईल, या भितीने सर्वांच्याच नजरा स्वच्छतागृहाकडे वळल्या होत्या. तेवढ्यात कन्यारत्नाचा रडण्याचा आवाज येताच प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सुखद तेवढीच काळजाचे ठोके चुकवणारी ही घटना सोमवारी दुपारी ४ वाजता मालदा एक्स्प्रेसमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मगरचंद राय हे पत्नी पानवतीदेवी (रा. फुलजरा ता. बंदरजरा , झारखंड) हे दाम्पत्य बलसाड येथे मोलमजुरी करून आपला संसार फुलवत आहेत. त्यांना दोन मुले असून पानवतीदेवी तिसऱ्यांदा गरोदर होती. ती सातव्या महिन्याची गरोदर असल्याने प्रसूतीसाठी ते सुरत येथून मालदा एक्स्प्रेसने आपल्या गावी जात होते. सातवा महिना असल्याने प्रसुतीची कोणतीही शक्यता नव्हती. मात्र पार्वतीदेवी यांना दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिंदखेडा ते अमळनेरदरम्यान धावत्या रेल्वेतच प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे पती मगरचंद राय हे घाबरले. जनरलच्या डब्यात प्रवास करीत असताना मोठी गर्दी होती. रेल्वे धावत होती तशी त्याच्या व पानवतीच्या काळजाची धडधड वाढत होती. सह प्रवाशीही घाबरले होते.
महिलांनी दाखवला माणुसकीचा धर्म
कोणताही प्रवास हा काही तासांचा असतो. त्यामुळे तो सुखात केला पाहिजे असे म्हटले जाते. म्हणूनच पानवतीदेवीला प्रसुती कळा सुरू झाल्याने आजूबाजूच्या आयाबाया त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला थेट रेल्वेच्या स्वच्छतागृहात नेऊन तिची प्रसूती केली. गोंडस अशा कन्यारत्नेला पानवतीदेवीने जन्म दिला. सहप्रवाशी महिलांनी दाखवलेल्या माणुसकी धर्माने पानवतीदेवीची प्रसूती सुखर झाली. तिच्या पतीने आणि तिने या महिलांचे मनापासून आभार मानले.
अमळनेर रुग्णालयातही करणखेड्याच्या आजीबाईनेही दिला मायेचा हात
मालदा एक्स्प्रेस अमळनेर स्थानकावर आल्यावर रेल्वे पोलिसांनी तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नातीला उपचारासाठी घेऊन आलेल्या करणखेडा येथील आजी भिकूबाई शिवाजी भिल या महिलेने पानवतीदेवीच्या आणि मुलीची सर्व स्वच्छता केली. बाळाला कपडे आणून देत तिची देखभाल करीत आहे.यामुळे या झारखंडच्या दाम्पत्याला रुग्णालयातही मायेचा आधार मिळाल्याने त्यांचे उर भरून आले होते.