धुळे येथील कर अधिकारी आणि त्याच्या डॉक्टर मित्रासह चौघांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथील कर अधिकारी आणि त्याच्या डॉक्टर मित्रांसह चौघांना मोटारसायकलवरील सहा जणांच्या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवून लुटल्याची घटना मंगळवारी २६ रोजी रात्री धुळे रोडवर जानेव ते डांगर गावादरम्यान घडली. यात एक जण जखमी झाला असून या लुटारूंनी या चौघांकडून २१ हजार रुपये रोख आणि चौघांचे मोबाईल घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस या टोळीचा कसून शोध घेत आहेत.

धुळे येथील  कर अधिकारी विजय मगन सोनवणे , दीपक कैलास नांद्रे, नवी मुंबई ठाणे येथील डॉ. व्यंकट गोविंद मेकाळे,  नवापूर तालुक्यातील रायपूर येथील अनिल रमेश वळवी  हे चारचाकीने ( क्रमांक एमएच- २९, बीयु- २१४४ )  अमळनेर येथील पैलाड येथून रात्री साडे दहाच्या सुमारास धुळे जात होते. जानवेपासून १ किमी अंतरावर पुढे डांगर गावाच्या अलीकडे दोन मोटरसायकलवर सहा तरुणांनी आपल्या मोटारसायकली आडव्या करून त्यातील लाल रंगाचा शर्ट घातलेल्या तरुणाने हातातील पिस्तुल त्यांच्या दिशेने रोखले व काच उघडण्यास सांगत असताना काळ्या रंगाचा कोट घातलेल्या तरुणांने सात ते आठ किलोचा दगड काचेवर मारून गाडीच्या खिडकीची काच फोडली. त्यामुळे विजय सोनवणे यांचा हाताला व मांडीला जखम झाली. तुमच्याजवलील सर्व मौल्यावन साहित्य, वस्तू आणि पैसे काढून द्या नाहीतर गोळ्या घालून मारून टाकेल, अशी दोघांनी धमकी दिली. त्यानंतर सोनवणे यांच्याकडील ५ हजार रुपये व एक मोबाईल , नांद्रे यांच्याकडील ४ हजार रुपये व मोबाईल, डॉ. मेकाळे यांचे ९ हजार व मोबाईल, वळवी यांचे ३ हजार व १ मोबाइल असा एकूण २१ हजार रुपये व ४ मोबाईल हिसकावून पळून गेले. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अंबादास मोरे व पोलिसांनी धाव घेतली मात्र आरोपी मिळून आले नाही.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे
पोलीस अधिकारीही घेताय शोध

दरम्यान, घरफोडीत २ मोटारसायकली व ६ तरुण आणि दरोड्यातदेखील तशीच स्थिती  व पारोळा येथील गोळीबाराच्या घटनेशी अमळनेरचा संबंध असल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी स्वप्नील नाईक, सुधाकर लहारे, रामचंद्र बोरसे, नारायण पाटील , राजेश मेंढे  यांनी घटनास्थळी भेटी देऊन आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *