पाच बचत गटांनी व्यापारी गाळ्यांमध्ये केली शाळा, पंचायत समितीने कारवाई करून शिकवला धडा…

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाच बचतगटांना व्यवसायासाठी पंचायत समितीने गाळे उपलब्ध करुन दिल्यानंतर या बचत गटांनी शाळा करीत पोटभाडेकरू ठेवले. त्यामुळे पंचायत समितीच्या मूळ हेतूला हरताळ फासल्या गेल्याने पंचायत समितीने कठोर पावले उचलत हे गाळे ताब्यात घेतले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून पोलिस संरक्षणात हे गाळे बचत गटांकडून सोमवारी ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली.
अमळनेर पंचायत समितीच्या अधिनस्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील बसस्थानक नजीक धुळे रोड जवळील एकूण ०५ व्यापारी गाळे पंचायत समितीने दि.१७/११/२००७ रोजी मासिक सभेत ठराव क्रमांक १४० आणि दि.८/९/२००८ मासिक सभेत ठराव क्रमांक ३०४ अन्वये बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी पाच वर्षासाठी ही व्यापारी गाळे भाड्याने देण्यात आले होते. परंतु या व्यावसायिक गाळ्यांमध्ये बचतगटामार्फत पोटभाडेकरु ठेवले होते. या र पोटभाडेकरुंनी व्यापारी गाळयांमध्ये व्यवसाय करीत असल्याचे पंचायत समितीकडून करण्यात आलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. तसेच या गाळयांची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही गाळेधारकांनी गाळे खाली करून दिले नाहीत. त्यामुळे पंचायत समितीने हे गाळे खाली करणेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र गोव्हर्नमेंट प्रिमाईसेस(इव्हीक्शन) अॅक्ट चे कलम ४ व ५ अन्वये गाळे ताब्यात मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. याप्रकरणात अॅड.किरण पाटील, अमळनेर यांचेमार्फत इव्हीक्शन पिटीशन दि.२८/५/२०१९ रोजी दाखल करण्यात आले होते. ही इव्हीक्शन पिटीशन दाखल करण्यापूर्वीच उत्तर महाराष्ट्र महिला विकास स्वयंसहायता बचत गट (टाकरखेडा) यांनी स्वत:हून त्यांचे ताब्यातील गाळा खाली करून दिला आहे. तर इव्हीक्शन पिटीशनमध्ये जिल्हाधिकारी यांनी गाळे खाली करण्याबाबत आदेश पारित केल्याने संबंधितांना गाळे खाली करण्यासाठी एक महिन्याची मुदत देऊनदेखील गाळे खाली केले नाहीत. त्यामुळे सोमवारी १८ रोजी पोलिस संरक्षणामध्ये गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तसेच पंचायत समितीचे सभापती व सदस्यांच्या उपस्थितीत गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही करण्यात आली.
या बचत गटांना दिले होते गाळे भाड्याने अमळनेर पंचायत समितीने पेडकाई माता स्वयंसहायता बचत गट (धार ता.अमळनेर), कालभैरव बचतगट (बोदडे ता.अमळनेर), जयलक्ष्मी स्वयंसहायता बचत गट (लोंढवे ता.अमळनेर). संत तुकडोती महाराज स्वयंसहायता बचत गट (जानवे ता.अमळनेर), उत्तर महाराष्ट्र महिला विकास स्वयंसहायता बचत गट (टाकरखेडा ता.अमळनेर) यांना बचत गटांना दिले होते. मात्र त्यांनी पोटभाडेकरी ठेवून उद्देशाला हरताळ फसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *