चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या कन्हेरे येथील चिंचदेवी यात्रेची जय्यत तयारी

अमळनेर (प्रतिनिधी) भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या तालुक्यातील बोरी नदी काठावरील कन्हेरे येथील चिंचदेवीच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास बुधवारी २० नोव्हेबरपासून सुरुवात होत आहे. यामुळे गावात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण असून यात्रोत्सवासाठी बाहेरगावी गेलेले कुटुंबीयही यात्रोत्सवासाठी परतत आहेत. यामुळे घराघरात कौटुंबीक आनंद असून चिंचदेवीच्या घोषणाने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाली असून गावा यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे.
चिंचदेवी ही या परिसरातील तीन गावांची ही कुलदेवता आहे. या यात्रोत्सवाला सुमारे ४०० वर्षांची पंरपरा आणि इतिहास आहे. येथे अष्टमीला यात्रोत्सव व नवमीला गयबानशहाबाबा उरूस भरत असल्याने ही यात्रा सामाजिक एकतेचे प्रतिक म्हणून ओळखली जात आहे.
मंदिराची सजावट आणि रंगरंगोटी चार वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून मंडप, मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली आहे. यावर्षी मंदिराला कळस बसवण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या सुशोभिकरणात भर पडली आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याने परिसरातील अनेक भाविक नवस फेडण्यासाठी या मंदिरात येत आहेत.

असा आहे चिंचेदेवी मंदिराचा इतिहास

जयसिंगराव यांची ११०५ संवतमध्ये मांडवगड (मध्य प्रदेश) येथे वतनदारी होती. त्यांना मानाजीराव नावाचा पुत्र होता. त्यानंतर मानाजीराव यांना रावजी व भावजी ही दोन मुलं होते. ते मांडवगड येथून विजयगड (मध्य प्रदेश) ला आले. तेथील पाटीलकी त्यांना मिळाली. रावजी यांना कामातीश व रामतीश आणि बागजी ही मुले होती. ते विजयगड येथून, डोंगरगाव (ता. शहादा) येथे आले. तेथे त्यांना वतनदारी मिळाली. पुढे भाव आणि रावजी यांचा परिवार डोंगरगाव येथून कन्हेरे गावी स्थायिक झाला. त्यांनी संवत १६०५मध्ये कन्हेरे येथे चामंडा ऊर्फ चिंचदेवी मंदिर उभारले आहे. आता हे देवस्थान परिसरातील अनेकांचे श्रद्धास्थान झाले आहे.

चिंचदेवी यात्रा आणि उरूसातून घडते एकात्मतेचे दर्शन…

चिंचदेवीला लागूनच गयबानशहाबाबा यांची समाधी आहे. गावात मुस्लिम वस्ती नसतानादेखील हे मुसाफिर बाबा कधी-काळी या गावात स्थिरावले होते. याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू भाविक या समाधीची पूजा करतात. गयबानशहाबाबांचा उरूस भरवतात. त्यामुळे चिंचदेवीच्या यात्रेतही परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे हिंदूमुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे दर्शन होते.

गुलाब्या थंडीत चार लोकनाट्य

तमाशांनी रंगणार यात्रेच्या दोन रात्र यात्रेनिमित्त चार लोकनाट्य तमाशांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. यात पहिल्याच दिवशी २० रोजी बंडू नाना धुळेकरसह सुनिताबाई धुळेकर यांचा आणि शांताराम चव्हाण, दहिवदकर यांचा लो लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दोन्ही पार्ट्यांचे तमाशे २१ रोजीही आयोजित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जुन्या पद्धतीचा स्पेशन खान्देशी ढंगात हे तामाशे सादर होणार असल्याने रसिकांसाठी गुलाब्याच्या थंडीत खास मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *