खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

नंदुरबारहून आले तरी आम्ही नाही केले दूर, खोट्या विकासाच्या नावाने बडवू नका उर

खरं सांगा ना 'दादा' पाच वरीसमा काय, काय करं..?

अमळनेर (खबरीलाल विशेष) आपल्या गावाचा आणि शहराचा विकास व्हावा ही मतदारांची माफक अपेक्षा असते. लोकप्रतिनिधींचाही तो ध्यास असतोच. म्हणून आमदार शिरीष चौधरी यांनी पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वसांनाची किती पूर्तता केली, याचे ऑडिट आता जनता करू लागली आहे. त्यांनी पाच वर्षापूर्वी “वचननामा” दिला होता. आता वचननामा पूर्तीतून त्यांनी केलेल्या विकास कामांची जंत्रीही मतदारांपुढे ठेवली आहे. या कामांची जंत्री पाहून मतदारांची तंत्री भंग झाली आहे. न केलेल्या कामांचेही ते श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांनी पाच वर्षात काहीच कामे केली नाहीत, असे नाही पण जी कामे केली, त्याचेच श्रेय त्यांनी घ्यावे. उगाच फुकटचे श्रेय घेऊन भोळ्याभाबळ्या जनतेच्या डोळ्यात नंदुरबारच्या मिरचीची पुळ फेकून डोळे चुरचुरायाला लावू नये. कारण ते नंदुरबारहून येऊन निवडणुक लढले. अपक्ष असूनही मतदारांनी प्रस्तापितांना बाजूला करून त्यांना अक्षरशा डोक्यावर घेतले. म्हणून त्यांच्याकडून मतदारांच्याही ठोस अशा अपेक्षा होत्या. सोशल मीडियामुळे आजचा मतदार हा जागृत आणि हजरजबाबी झाला आहे. त्यांच्यापुढे उगाचच खोट्या विकास कामांचा उर बडवला जात असल्याने तेच आता खरं सांगा दादा पाच वर्षात काय काय केलं ?, याचा हिशोब मागू लागले आहेत.

चोपडा, जळोद रेल्वेगेट उड्डाणपुलाचे फेकू श्रेय…

कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याच कार्यकाळात केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयामार्फत अमळनेर शहरासाठी उड्डाण पुलांना ३२ कोटी ९० लाख ६० हजार रुपये खर्च प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. -अमळनेर चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनीच्या पुढील रेल्वे क्रॉसिंग बार यांचा समावेश होता. मग आमदार शिरीष चौधरींनी चोपडा, जळोद रेल्वेगट उड्डाणपुलासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नपाचे ज्यांनी केले भूमीपूजन त्यांनीच इमारतीचे केले उद्घघाटन

खरेतर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केले होते. आणि योगायोगने त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा झाल्याने त्यांनीच प्रशाकीय इमारतीचे उद्घघाटन केले. या इमारतीचे काम जवळजवळ झाले असून यात पालिकेला ४५ गाळे मिळणार आहेत. यातून पालिकेला १० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्नही मिळणार आहे. मग शिरीष चौधरींनी या इमारतीची पायाभरणी कशी केली, असा प्रश्न पुढे येत आहे.

पाच वर्षांपासून विनताय, सुतगिरणीचे सुत

अमळनेरनगरीला उद्योगाचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राजमाता जिजाऊ सहकारी सुतगिरणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे, असे ते पाचवर्षापूर्वीही म्हटले होते. मात्र अद्याप ती उभी राहण्याचे कोणतेही चिन्ह नाहीत. त्यामुळे तरुण मतदारांच्या हाताला काम मिळाले नाही. बेरोजगारी वाढली असून सुतगीरणीचा धागा मतदारांना कितपत बांधून ठेवले, हे लवकरच कळणार आहे.

पाच वर्षात जमले नाही शहराचे प्रवेशद्वार

आमदार चौधरी यांनी वचनपूर्तीनामा प्रसिद्ध करताना अमळनेर शहरातील धुळे रोडवरील नियोजित प्रवेशद्वारही दाखवले आहे. त्यांचे वचनपूर्ती आहे की वनचनामा आहे हेच कळत नाही. त्यामुळे ते मतदारांच्या डोळ्यात किती धुळ झोकत आहेत, हे स्पष्ट आहे. हे प्रवेशद्वार करतानाही मोठे पापड पेलावे लागतील. कारण औरंगाबाद खंडपीठाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रवेशद्वार उभारताना रहदारीस अडथळा होऊन अपघात होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच यासाठी महापालिका, बांधकाम विभाग, पोलिस आधींची मान्यता घेऊनच ते उभारावे लागणार आहे.

नाट्यगृह उभारणी

शहरातील सांस्कृतिक वारसाला बळ देणारे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराची उभारणीही आमदार शिरीष चौधरी यांच्या आधीच झाली आहे. तसेच अमळनेर शहर व ग्रामीण भागात स्वखर्चातून महापुरूषांचे स्मारक निर्मिती केल्याचाही दावा त्यांनी केला आहे. पण या स्मारकांचा विषयही विवादात सापडला आहे.

भुयारी गटार योजनेचे वास्तव

शहरातील भुयारी गटारींचेही श्रेय आमदार शिरीष चौधरी घेत आहेत. पण या गटारींचे कामही त्यांच्या आधीच मंजूर झाले आहे. चार ते पाच नगराध्यक्षांच्या कार्यकाळातुन ते काम मार्गी लागत आहे. काही टेक्निकल मुद्यांवर हे कामही न्यायप्रविष्ठ झाले होत. तरी आता हे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा आव

अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचाही दावा त्यांनी केला आहे. पण या निधीचे ते कुटुंबीय हकदार होते. त्यामुळे तो त्यांना मिळणारच होते. पण आमदार शिरीष चौधरींना ज्या मतदारांनी निवडणून दिले अशा अपघातग्रस्त किती कुटुंबांना आणि किती निधी स्वतः दिला, याचे उत्तर त्यांनी दिले तर खऱ्या अर्थाने त्यांनी मदत केली असे म्हणावे लागले, नाहीतर मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाल्याचा हा प्रकार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही.

पोलिस वसाहतीसाठी फुकटची फौजदारकी…

शहरातील पोलिसांच्या निवासासाठी ४२ निवासस्थाने बांधण्यात येत आहे. हे कामही आमदार शिरीष चौधरी यांच्या आधीपासून सुरू आहे. पण ते कामही आपणच पूर्ण केल्याचा दावा ते करीत आहेत. ते आमदार होण्या आधीच ३० जुन २०१४ रोजी ३८० लाखांचा निधी या निवास्थान बांधण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला होता. त्यामुळे याचेही फुकटचे श्रेय ते घेत आहेत.

ग्रामीण व शहरी भागातील झुलते पूल..

माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळच बरेच पुलांचे काम मंजूर झाले आहेत. आमदार शिरीष चौधरी यांनी ग्रामीण आणि शहरी भागासाठी लहान-मोठे १५ पुल केल्याचा दावा केला आहे. पण ते कोणते केले याचा कोणताही खुलासा त्यांनी केला नाही. त्यामुळे खरच किती पुलांचे काम त्यांनी केले, असा सवाल मतदार विचारू लागले आहेत.

कलाली पाणीपुरवठा योजना कोरडीच..

अमळनेर शहराची जीवनदायी ठरणारी कलाली पाणीपुरवठा योजनाचाही दावा ते करीत आहे. पण हे कामही मार्गी लागले नाही. हे काम मार्गी लागले असते तर अमळनेरकरांना उन्हाळ्यात १५ – १५ दिवसांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागली नसते. त्यामुळे त्यांचा हा दावाही जनतेच्या दरबारात फोल ठरला आहे.

विद्यमान आमदारांनी ही केली दमदार कामे..

आमदार चौधरी यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे आणि समाजोपयोगी कामेही केली आहेत. त्यांनी खळेश्वर स्मशानभूमी बांधून अंत्यसंस्कारासाठी होणारी गैररसोय टाळली आहे. मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाचे काम प्रगतिपथावर असल्याने विद्यार्थिनींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजीपाला मार्केट नूतनीकरण विक्रेतेने आणि ग्राहकांची चांगली सोय करून दिली आहे. संत सखाराम महाराज भक्त निवास इमारत प्रगतिपथावर असल्याने भाविकांसाठी चांगली सोय होणार आहे. २८ गावात शुद्ध पाण्याची आरओ प्रणाली बसवल्याने आरोग्याच्या दृष्टीन चांगले काम केले आहे. अमळनेर तालुक्यात ३४ ग्रामपंचायत इमारती उभारून गावाची शान वाढवली आहे. १०३ सभागृह व सभामंडप बांधून वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी त्यांचा चांगला उपयोग होईल. मतदार संघातील आदिवासी बांधवांसाठी ४३ गावांमध्ये देवमढी उभारून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ गावांमध्ये प्रवेशद्वार उभारून गावाचे सौंदर्यात भर घातली आहे.
३९ गावात व्यायामशाळा व साहित्य पुरवले आहे. काही ठिकाणी साहित्य देणे बाकी असले तरी हा चांगला उपक्रण राबवला आहे. मतदार संघात १५० हायमस्ट लॅम्प बसवून अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हिरा उद्योग समुहाच्या स्वखर्चातून व जलयुक्त शिवार योजनेत ११३ गावांमध्ये नालखीकरण, रुंदीकरण, गाळ काढणे व बंधारे बांधणून पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठीचाही प्रयत्न उत्तम आहे. ईदगाह मैदानावर पेव्हर ब्लॉक बसवून मुस्लिम बांधवांची सोय केली आहे. मतदार संघातील सर्वच गावे रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण केले आहे. विद्यार्थी आणि महिलांना ई-पब द्वारे घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिले आहेत. पण कायमस्वरूपाचा रोजगार मिळवून देणे त्यांच्याकडून अपेक्षित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button