मुख्यमंत्री साहेब, आदिवासी ठाकूर जामातीलाही न्याय द्या.!

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनादेश यात्रेच्या आगमनाप्रसंगी हेडावे चौफुलीवर महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमातीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीतूनच महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाच्या वतीने अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, राज्य सरचिटणीस रणजित शिंदे यांनी दिलेले ठाकूर जमातीच्या विविध प्रश्नांचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार शिरीष चौधरीउपस्थित होते. निवेदनावर राज्य सरचिटनिस रणजित शिंदे, जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर, अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव प्रकाश वाघ, आदींच्या स्वाक्षरी होत्या. ठाकूर जमातीच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने कार्यवाही करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यात प्रामुख्याने अनुसूचित जमात प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी ठाकूर जमातींचे उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रलंबित प्रस्ताव वैधता प्रमाणपत्र देऊन गतिमानतेने मार्गी लावावेत. रक्त नात्यात वैधता प्रमाणपत्र असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रलंबित प्रस्तावात तातडीने वैधता प्रमाणपत्र अदा व्हावेत. उच्च न्यायालयाने अथवा सर्वोच्च न्यायालयाने वैधता प्रमाणपत्र देण्याचा निर्णय एखाद्या कुटुंबातील सद्स्यास दिला असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांचे प्रलंबित प्रस्तावात समित्यांनी तातडीने वैधता प्रमाणपत्र अदा करावेत. निवृत्त न्यायधिश हरदास समितीच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात. नंदुरबार समितीच्या कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी धुळे येथे तपासणी समितीचे कार्यालय सुरू करावे. अनुसूचित ठाकूर जमातीच्या उमेदवारांना शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणाचे लाभ मिळावे म्हणून सर्व जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांना प्रलंबित प्रकरणे काढण्यासाठी विशेष मोहिमेअंतर्गत वरील मागण्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना शासन स्तराहून जारी व्हाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळ अमळनेरतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *