अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर सध्याची परिस्थिती पाहता आज बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराची नितांत गरज आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराला प्राधान्य दिल्यास प्रत्येक कुटुंबाची प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा बॅँक संचालक अनिल भाईदास पाटील यांनी स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळेत केले.
अमळनेर येथील ज्ञानवर्धिनी फाउंडेशन या संस्थेतर्फे तांबेपुरा परिसरातील सुमारे १५० महिलांना दि. ७ व ८ रोजी स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी महिलांना संबोधित केले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक महिलेने फावल्या वेळेत गृहउद्योग केलेत तर हाताला काम आणि कुटुंबासाठी पैसा मिळेल अर्थात कुटुंबाची प्रगती होत पर्यायी समाजाची, तालुक्याची आणि देशाची प्रगती होणे शक्य आहे. यासाठी ज्ञानवर्धिनी फाउंडेशनने उचलेले हे पाऊल उल्लेखनीय आहे, असेही पाटील म्हणाले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रतिभा देसले यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. शिवाय यावेळी महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण केंद्र जळगावचे प्रशिक्षक समन्वयक विजय सैंदाणे आणि खामकर सैंदाणे यांनी उपस्थित महिलांना घरी बसल्या मेणबत्ती, फिनाइल, वॉशिंग पावडर आणि द्रव साबण कसा तयार करावा याचे प्रशिक्षण दिले. शिवाय गृहउद्योगासाठी कच्चा माल कुठून आणावा, तयार केलेला माल कसा आणि कुठे विकावा तसेच उद्योग उभारणीसाठी कर्ज कसे मिळवावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्तविक आणि सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी पं. स. सभापती सुभाष देसले, रहिम पिंजारी, सोपान भवरे, अनिता मोरे यांनी प्रयत्न केले.