पाडळसरेसाठी ‘भिक मांगो वाले’ म्हणून हिणवतांना श्रेयासाठी आता आमदारांची कुठे ठेवली अ‘स्मिता’

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेरसह, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा ठरलेला पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने प्रदीर्घ काळापासून आंदोलन छेडले आहे. यात साखळी उपोषण, जेलभरो आंदोलन, जलसत्याग्रह करून अवहेलना झेलली आहे. याचे फलित म्हणूनच या प्रकल्पासाठी नाबर्डकडून १५०० कोटीच्या कर्ज मंजुरीस मंत्रीमंडळात मंजुरी मिळा आहे. समिती आंदोलन करीत असताना ज्यांची खऱ्या अर्थाने तालुक्याशी नाळ जुळली आहे, त्या आमदार स्मिता वाघ यांनी याकडे दुर्क्ष करून आंदोलकांचीच टर उडवत ‘भिक मांगो वाले’म्हणून हिनवले होते. मात्र समितीच्या प्रयत्नाने आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठींब्याने १५०० कोटीचा निधीस मान्यता मिळाल्याने त्याचे फुकटे श्रेय आमदार स्मिता वाघ घेऊ पाहत आहेत. त्यामुळे आंदोलनकाना ‘भिक मांगो वाले’म्हणून हिणवताना श्रेयासाठी आता आमदारांची अ‘स्मिता’कुठे ठेवली आहे, असा प्रश्न पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ७ तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्ड व इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज मागणीच्या दिलेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्री गिरीशजी महाजन यांना आम्ही याआधीच अमळनेर भेटीचे आमंत्रण दिले असता ‘पाडळसरे धरणासाठी ठोस निधी मी महिनाभरात आणणार!” असे त्यांनी भ्रमणध्वनीने सांगितले होते. जलसंपदामंत्री महाजन यांचा अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे तर आमदार स्मिता वाघ यांनी १५०० कोटी रुपये निधीच्या कर्ज मंजुरीचे मान्यता मिळवून दिल्याचे श्रेय घेऊ नये! असे जाहीर आवाहन पाडळसरे धरण जनआंदोलन समिती करीत आहे.

समितीने असा दिला लढा….

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने धरणाचे काम गतिमानतेने व्हावे, निधी मिळावा म्हणून साखळी उपोषण, जेलभरो आंदोलन, जलसत्याग्रह इत्यादी आंदोलन प्रदीर्घ काळ छेडली आहेत. या जनआंदोलनात एकदातरी आपण येऊन केलेल्या कथित खूप अशा प्रयत्नांना जनतेसमोर मांडण्याचे धारिष्ट्य का केले नाही? लोकप्रतिनिधी म्हणून आंदोलनास पाठींबा देणेचे आपले कर्तव्य आपण का विसरलात? जनतेने स्वयंयंस्फूर्तीने उभारलेल्या आंदोलनाला आपण कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही ही वस्तूस्थिती का विसरता? निम्न्नतापी प्रकल्प पाडळसरे धरणास १५०० कोटी रुपये निधीच्या कर्ज घेणेस मिळालेल्या मान्यतेचे श्रेय आमदार स्मिता वाघ आपण स्वतः घेताय, त्यात जनतेच्या जनआंदोलन समितीची काहीच भूमिका नाही का? लेखी आमंत्रण देऊनही सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठक टाऊन हॉल मध्ये बोलावली असताना आपण अनुउपस्थित राहिलात. आंदोलनकर्त्यांना “भिक मांगो वाले”म्हणून आपणच हिणवले हे विसरलात का? केंद्रीय जल आयोगाची मंजुरी मिळवण्यात दिनांक ५ एप्रिल२०१८ चा अमळनेरात निघालेल्या महामोर्चाचे योगदान आहेच हे विसरून चालणार नाही.

आमदार वाघ यांनी खोटे बोलणे सोडावे….

नुसते बोर्ड लावण्याऐवजी पाडळसरे धरण पूर्ण व्हावे, असे जर आपणास वाटले असते तर त्यांनी पूर्णपणे प्रयत्न केले असते. जल आयोगाची मान्यता मिळविण्यास आपणासच यश आले, धरणास मोठा निधी मिळावा म्हणून आपणच प्रयत्न केले तर पाडळसरे धरण जनआंदोलन समितीसमोर आपण का येत नाही? पाडळसरे धरणासाठी १५०० कोटींच्या कर्ज घेणेस मंजुरी आपल्यामुळे मिळाली असेल तर शासनाशी याबाबत आपला पत्रव्यवहार, शासन आदेश आदी पुराव्यासहित जनतेसमोर सादर करावेत. नाहीतर आम्ही आपणास वडीलकीच्या नात्याने सल्ला सल्ला देत आहोत की, आपण खोटे बोलणे सोडावे, आम्ही आपणास असे शिकवलेले नाही. धरणास जाहीर झालेल्या १५०० कोटींच्या निधी, कर्ज मान्यतेसंदर्भातील आपल्या प्रयत्नांचे पुरावे आपण सादर केल्यास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आपलेही फोटो आम्ही घराघरात लावू! अन्यथा….. असा इशाराही दिला आहे.

“यशाचे श्रेय सर्वांचे”

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निम्न्नतापी प्रकल्प पाडळसरे धरणाच्या पूर्तीसाठी १५०० कोटी रुपये निधीसाठी कर्ज घेण्यास मिळालेल्या मंजुरीच्या श्रेयात पाडळसरे धरण जनआंदोलन समिती, समितीच्या जनआंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेली जनता ,प्रिंट,इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सर्व पत्रकार, सोशल मीडिया, आंदोलनात सहभागी सर्वच सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, अमळनेर सह, चोपडा, पारोळा, धरणगाव, शिंदखेडा, धुळे येथील शेतकरी, कष्टकरी व आंदोलनात स्वेच्छेने उत्स्फूर्त सहभागी झालेले सर्वच लोकप्रतिनिधी यांचे सामुहिक प्रयत्नांचा वाटा मोलाचा आहे. असे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे पदाधिकारी सुभाष चौधरी, प्रा. शिवाजीराव पाटील, अजयसिंग पाटील, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनील पाटील, प्रशांत भदाणे, देविदास देसले, रामराव पवार , वसुंधरा लांडगे, एस.एम.पाटील,नाना पाटील, सुनिी पवारआदिंनी स्वाक्षरी निशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. समितीच्या बैठकीस रविंद्र पाटील, योगेश पाटील, पुरुषोत्तम शेटे आदिंसह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *