अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात सात महिन्यांपूर्वी घडलेली घटना लहान, मोठ्या आजारांवर उपचार करून रुग्णांना बरे करणारे डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच असल्याने त्यांनी केलेल्या उपचारांवर डोळे झाकून आपण विश्वास ठेवतो. अनेक डॉक्टर प्रामाणिकपणाने चांगले उपचारही करतात. मात्र यातील काही डॉक्टर रुग्णाच्या जीवावर उठून ‘देवदूत’ ऐवजी ते”यमदू”च ठरत आहे. असाच प्रकार अमळनेर येथील तरुणाच्या जीवावर बेतून त्याचा मृत्यू झाला. तर अखेर सात महिन्यांनी या नराधमांवर गुन्हा दाखल झाला आहे.
डॉक्टर व औषधी विक्रेत्याच्या हलगर्जीपणाने बालाजी पुरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना २७ जानेवारीला मध्यरात्री एकच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी तरुणाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एका डॉक्टरसह औषधी विक्रेत्यावर काल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शालीकराम परशुराम महाजन (वय ४२) यांना २६ जानेवारी २०१९ ला खोकल्याचा त्रास जाणवत होता. तीन दिवसापासून खोकला जात नसल्याने त्यांनी त्रिकोणी बागेजवळील द्वारका क्लिनिकमधील डॉ. पद्मनाभ पाटील यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली. यावेळी डॉ. पाटील यांनी त्यांना ॲझीथ्रो २५० एमजी (सहा गोळ्या) व रेफी कोल्ड (सहा गोळ्या) ही औषधी लिहून दिल्या. ही चिठ्ठी घेऊन रूग्ण शालीकराम महाजन हे गजानन मेडिकल चालक किशेार किसन लाखोटे यांच्याकडे गेले. त्यांनी पहिली गोळी बरोबर दिली. मात्र, दुसरी डॉक्टरांनी न लिहून दिलेली सिनोडेक कोल्ड ही गोळी दिली. या गोळ्या सेवन केल्याने त्याचा दुष्परिणाम होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा २७ जानेवारी २०१९ ला मध्यरात्री एकच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी शालीकराम महाजन यांच्या पत्नी श्रीमती विद्या महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात डॉ. पद्मनाभ पाटील व मेडिकल चालक किशोर किशेार लखोटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. यात डॉ. पाटील यांनी हे बीएएमएस डॉक्टर असून, त्यांना आयुर्वेदिक गोळ्या लिहून देण्याऐवजी ॲलॉपॅथीची औषधे लिहून त्यांना त्या गोळ्या सेवन करण्याचा सल्ला दिला. तसेच औषधी चालकानेही चुकीची गोळी दिल्याने दोघांच्या हलगर्जीपणाने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनात हवालदार प्रभाकर पाटील तपास करीत आहेत.
तब्बल सात महिन्यानंतर गुन्हा दाखल…
शालीकराम महाजन यांच्या पत्नी विद्या महाजन यांनी याप्रकरणी सात महिन्यापासून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. या प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, विच्छेदनाचा, व्हिसेरा अहवाल आदी कागदपत्रांची पडताळणी करून हा अहवाल जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ठेवण्यात आला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एका समितीने या अहवालावर निष्कर्ष काढून गुन्हा दाखल करण्याबाबत मान्यता असल्याचा अहवाल दिल्याने हा गुन्हा आज दाखल झाला. तब्बल सात महिन्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने श्रीमती महाजन यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. तसेच त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
औषधी विक्रेता तरोटा मालकाचा उर्मटपणा….
श्रीमती विद्या महाजन या संबंधित औषधी विक्रेत्याकडे उपचारावेळी गेल्यावर माझ्या पतीस तुम्ही चुकीची गोळी दिल्याने त्रास झाल्याचे सांगितले. यावेळी संबंधित औषधी विक्रेत्याने ‘माझ्या तीन रुपयाच्या गोळीत तुमचा नवरा मरणार नाही. मेला तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मग मी पण मरून जाईल’ अशा उर्मट शब्दात श्रीमती महाजन यांना वागणूक दिल्याचे श्रीमती महाजन यांनी सांगितले.